परप्रातियांची नोंदणी करण्यासाठी मनसेचे निवेदन

। चिपळूण । वार्ताहर ।
राज्यात परप्रांतीय मजुरांकडून गंभीर गुन्हे घडत आहेत. चिपळूणमध्ये देखील असेच गुन्हे घडले आहेत. केंद्रसरकारने अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे आंतरराज्यीय स्थलांतरित कामगारांना रोजगाराचे नियम आणि सेवेच्या अटी अधिनियम कायदा लागू केलेला आहे. परंतु या कायद्याची अंमलबजावणी चिपळूण तालुक्यात होत नसल्याने या कायद्यान्वये संबधित आस्थापनेने परप्रातियांची नोंदणी करावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष नलावडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी चिपळूण पोलीस स्थानक आणि तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने कोकणात विशेता चिपळूण येथे येत असतात. बिहार, ओरिसा, आसाम, उत्तर प्रदेश, गुजरात, केरळ, मध्यप्रदेश, झारखंड अशा विविध राज्यातून परप्रांतीय कामगार येत असतात. मागील काळात चोरी, बलात्कार असे प्रकार घडले आहेत. या लोकांना शोधण्यासाठी आपल्या पोलिसांना बराच वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे. यासाठी आता भविष्याचा विचार करून आशा पद्धतीची नोंदणी होणे गरजेचे आहे. यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही तशा सूचना दिल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी महिला तालुकाध्यक्ष शोभाताई पावसकर, उपतालुकाध्यक्ष अभिनव भुरण, विवेक मोरे, महिला उपशहराध्यक्षा वृषालीताई सावंत, गुरू पाटील, परेश साळवी, जाईम मोदक, अस्मिता पेंढाम्बर,मानसी मुदलिआर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version