| सुधागड-पाली | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली बसस्थानकाची पाच वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. त्यासंदर्भात सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ठाणे ते पाली-कोशिंबळे दरम्यान नियमित बस सेवा सुरू ठेवावी आणि सायंकाळी साडेचार वाजता नवीन बस सेवा सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. त्यावर सरनाईक यांनी नागरिकांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत पालीसाठी तत्काळ दोन बस फेऱ्या वाढविण्याचे आदेश संबंधित परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच, त्यांनी पेण एसटी आगाराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाली बसस्थानकाच्या नुतनीकरणाची कार्यवाही लवकरच सुरू करण्याचे आश्वासन देखील दिले आहे. यावेळी सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, उपाध्यक्ष वसंत लहाने, संपर्कप्रमुख सुनील तिडके, शाखाप्रमुख अनिल भोईर, सल्लागार विठ्ठल खेरटकर आदींसह संघाचे इतर सदस्य, ग्रामस्थ मंडळ आणि सुधागडवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.