| महाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्ग आज देखील सुखकर प्रवासासाठी योग्य नसल्यामुळे त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला बसत आहे. त्यामुळे येत्या गणेशोत्सवापूर्वी मार्ग वाहतुकीस सुखकर न केल्यास शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून चक्का जाम केला जाईल, असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रडत खडत सुरू आहे. आज देखील नागोठणे, वडखळ व लोणेरे या ठिकाणी तसेच पुढे चिपळूण दरम्यान रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. झालेला काँक्रीट मार्ग देखील उंच सखल आणि खाज खळग्यांचा झाला असल्याने रस्त्यावरून वाहने चालवताना वाहनांचे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे वाहनांचे टायर देखील गरम होतात. अशा प्रकारच्या तक्रारी वाहन चालकांकडून येत आहेत. नागोठणे, लोणेरे, कोलाड या ठिकाणी देण्यात आलेल्या पर्यायी मार्गावर देखील खड्डेच खड्डे पडले आहेत. तसेच, पुलांची कामे देखील अपूर्ण आहेत. या सर्व कामांचा आणि निकृष्ट दर्जाच्या महामार्गाचा त्रास गणेशोत्सवात येणाऱ्या चाकरमान्यांना बसतो. त्यामुळे महाड मधील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महान प्रांताधिकारी यांना मुंबई-गोवा महामार्गाबाबत निवेदन सादर केले आहे.







