| पनवेल | ग्रामीण वार्ताहर |
पनवेल पालिका हद्दीत सध्या जलवाहिनी आणि सिवरेज वाहिनींची कामे सुरु आहेत. ही कामे निष्कृष्ट दर्जाची असून, कामाची प्रत्यक्षात पहाणी आणि पडताळणी करून संबधित ठेकेदारवर कारवाई करा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आली आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीत अमृत योजने अंतर्गत अटल मिशन आणि शहरी परिवर्तन मोहिमेतून विकास कामे करण्यात येत आहेत. मात्र, कामोठे पुल ते मानसरोवर स्टेशन पर्यंत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनी आणि कलंबोलीतील सिटी हॉस्पिटल ते मार्बल मार्केट पर्यंत टाकण्यात येत असलेल्या सिवरेज वाहिनींचे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे. तसेच, निष्कृष्ट दर्जाच्या कामाची प्रत्यक्षात पहाणी आणि पडताळणी करून संबधित ठेकेदारवर कारवाई करावी, अशी मागणी देखील पनवेल आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनद्वारे करण्यात आली आहे.
आम्ही प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पहाणी केली असता दोन्ही ठिकाणी निष्कृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे निदर्शनास आले. या वाहिनीला जर रस्त्यावरील वाहतुकीने धक्का लागून गळती लागल्यास त्यामुळे भविष्यात दूषित पाणी जाऊन प्रभागातील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, नियमाप्रमाणे काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर देखरेख न ठेवणाऱ्या संबधित कनिष्ठ अभियंत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
सुनील शिरीषकर,
उपाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, रायगड







