| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील मराठा समाजाचे तरुण हे पोलीस भरती आणि विविध नोकरभरती आरक्षण मिळवण्यासाठी धावपळ करीत आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी वर्गाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी आणि त्यांचे दाखले 31 मार्चपूर्वी देण्याची कार्यवाही व्हावी यासाठी सकल मराठा समाजाचे समन्वयकांनी कर्जत तहसीलदार यांना भेटून निवेदन दिले.
तालुक्यातील मराठा समाजातील तरुण हे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी तरुणांना शासनाने दिलेल्या आरक्षण याप्रमाणे जातीचे दाखले महत्वाचे आहेत. मात्र, तहसीलदार कार्यालयातून वेळेवर दिले जात नाहीत. त्यामुळे मराठा समाजातील तरुणाला त्या आरक्षणाचा फायदा मिळण्यात अडचणी येत आहेत. दाखले मिळत नसल्याची बाब लक्षात येताच सकल मराठा समाज कर्जत रायगड समन्वयकांनी तहसीलदार शीतल रसाळ यांची भेट घेतली.
यावेळी सकल मराठा समन्वयक राजेश लाड, अनिल भोसले, प्रकाश पालकर, रत्नाकर बेडकर, ज्ञानेश्वर भालीवडे, शिवाजी भासे, भानुदास पालकर, सुरेश बोराडे, अरुण देशमुख, योगेश घोलप, सतीश पिंपरकर, कैलास म्हामले तसेच, मराठा समाजातील पोलीस भरतीसाठी प्रयत्न करीत असलेले तरुण उपस्थित होते.