पनवेलमध्ये राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन

कांतीलाल प्रतिष्ठान, संघर्ष समितीचे आयोजन
। पनवेल । वार्ताहर ।
मराठी साहित्याचा वारसा जतन करण्याचे इंद्रधून पेलण्याचे धाडसी पाऊल उचलत कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि पनवेल संघर्ष समितीने एकदिवशीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलनाची घोषणा करून पनवेलसह रायगडातील सारस्वतांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनिस हे अध्यक्षस्थानी तर उद्घाटनाची जबाबदारी पानिपतकार विश्‍वास पाटील यांनी स्वीकारली असल्याची घोषणा स्वागताध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केली. हे संमेलन सर्वांसाठी खुले, विनामुल्य असून शनिवारी 22 जानेवारीला सकाळी 8.30 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत संपन्न होत आहे.


साहित्य संमेलनाच्या नियोजनाची बैठक ज्येष्ठ साहित्यिका तथा कोमसापच्या माजी जिल्हाध्यक्षा सुनीता जोशी यांच्या अध्यक्षतेखाली के. गो. लिमये वाचनालयाच्या सभागृहात पार पडली. व्यासपिठावर कांतीलाल प्रतिष्ठान रायगड व पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, ज्येष्ठ साहित्यिक विलास गावडे उपस्थित होते. एकदिवशीय राज्यव्यापी साहित्य संमेलनात राज्याच्या कानाकोपर्यातून साहित्यिक सहभागी होतील, असे नियोजन करण्याचे बैठकीत सर्वांनुमते ठरले. साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी प्राथमिक स्तरावर उपस्थितांमधून 30 सारस्वतांची मुख्य समिती गठित करण्यात आली असून त्यामध्ये अन्य समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यात येणार असल्याने समितीचा सह्याद्रीही उंच उंच वाढत जाणार आहे.

Exit mobile version