ॲथलेटिक्स ट्रॅकवर भारतीय महिला धावपटूंची दिमाखदार कामगिरी; आशियाडमध्ये भारताच्या खात्यात सहावे सुवर्ण
| नागोया | प्रतिनिधी |
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ॲथलेटिक्स ट्रॅकवर भारतीय महिला धावपटूंनी दिमाखदार कामगिरी करत देशाला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. महिलांच्या 4400 मीटर रिले शर्यतीत भारताने सुवर्णपदकावर नाव कोरले. किरण, मचेत्तिरा पूवम्मा, प्राची आणि विथ्या रामराज यांच्या चौकडीने 3 मिनिटे 29.69 सेकंदांत शर्यत पूर्ण करत अव्वल स्थान पटकावले. हे 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे सहावे सुवर्णपदक ठरले.
भारतीय संघाने सुरुवातीपासूनच पदकाच्या शर्यतीत आपले स्थान कायम ठेवले. सहाव्या लेनमधून भारताची रिले सुरू झाली. पहिल्या टप्प्यात किरणने धाव घेत बॅटन पूवम्माकडे सोपवले. सुरुवातीला भारत तिसऱ्या स्थानावर असला तरी अनुभवी पूवम्माने दुसऱ्या टप्प्यात वेग वाढवत भारताला आघाडीच्या शर्यतीत आणले.
त्यानंतर बॅटन प्राचीकडे सोपवण्यात आले. यापूर्वी 400 मीटरमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या प्राचीने तिसऱ्या टप्प्यात भारताची स्थिती मजबूत ठेवली. अखेरच्या टप्प्यासाठी विथ्या रामराजकडे बॅटन पोहोचले आणि त्यानंतर भारतीय संघाने सुवर्णाकडे झेप घेतली.
विथ्याची झंझावाती धाव
अंतिम टप्प्यात विथ्याने सुरुवातीला संयम राखत आपली लय पकडली. सुमारे 200 मीटरचा टप्पा गाठल्यानंतर तिने वेग वाढवला. बहरीनची सलवा ईद नासेर भारताचे अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र विथ्याने मिळवलेली आघाडी कायम ठेवत अंतिम रेषा सर्वप्रथम ओलांडली.
भारताने 3:29.69 वेळेसह सुवर्णपदक
बहरीनने 3:30.21 वेळेसह रौप्यपदक
चीनने 3:31.02 वेळेसह कांस्यपदक
विथ्याचे दुसरे पदक
नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेतील विथ्या रामराजचे हे दुसरे पदक ठरले. यापूर्वी तिने 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक पटकावले होते. आता 4400 मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकत विथ्याने आपल्या पदकात आणखी एका मोठ्या कामगिरीची भर घातली. क्रिकेट, कबड्डी आणि नेमबाजीतील सुवर्णपदकांनंतर आता ॲथलेटिक्समध्येही भारताने सुवर्णवेध घेतला आहे. भारतीय महिला धावपटूंच्या या कामगिरीमुळे देशाच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णाची भर पडली आहे. किरण, पूवम्मा, प्राची आणि विथ्याया चौघींच्या वेगवान पावलांनी आशियाडच्या ट्रॅकवर भारताचा तिरंगा पुन्हा एकदा दिमाखात फडकला.
पीटी उषा यांचा 42 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत विथ्या रामराजने अवघ्या 54.75 सेकंदात शर्यत पूर्ण केली. ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली. या कामगिरीसह तिने 1984 च्या लॉस एंजिल्स ऑलिंपिकमध्ये पीटी उषा यांनी नोंदवलेला 55.42 सेकंदांचा 42 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम इतिहासजमा केला. आता हा राष्ट्रीय विक्रम अधिकृतपणे विथ्या रामराजच्या नावावर नोंदवला गेला आहे.
