| गोवे-कोलाड | प्रतिनिधी |
गरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आनंदाचा शिधा वाटप शासनाकडून करण्यात येतो. परंतु रोहा तालुक्यातील 70 टक्के कुटुंबधारकांना हा आनंदाचा शिधा वाटप दिवाळी संपत आली तरी झाला नाही. मग शासनाकडून देण्यात येणारा शिधा वाटपाचा उपयोग काय? अशी संतप्त प्रतिक्रिया कुटुंबधारकांकडून व्यक्त केली जात आहे.
अंत्योदय व प्राधान्य कुटूंबांची दिवाळी आनंदात साजरा करता यावी यासाठी शासनाकडून आनंदाचा शिधा वाटप करण्यात येतो. शंभर रुपयात एक लिटर पामतेल, साखर, चणाडाळ, रवा, मैदा, पोहे, या जिनसा शिधा कुटुंबधारकांना वाटप करण्याचा निर्धार अपूर्ण राहिला आहे. अनेक उत्सव आनंदात साजरा व्हावे यासाठी शासनाकडून फक्त घोषणा केल्या जातात. परंतु प्रत्यक्षात मात्र उत्सव संपल्यावर हा शिधा वाटप करण्यात येतो, मग याचा उपयोग काय असा सवाल शिधाधारकांकडून केला जातो.
रोहा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात चार लाख तीस हजार 81 कुटुंब धारक आहेत. यातील एक लाख सात हजार कुटुंब धारकांना ऑनलाईन तर 35 हजार ऑफलाईन पद्धतीने वाटप करण्यात आले. तर अद्याप दोन लाख आठ हजार 881 धारकांना हा आनंदाचा शिधा वाटप केला गेला नाही म्हणजेच 70 टक्के कुटुंबधारकांना शिधा वाटप केला नाही. शासनाकडून अनेक घोषणा केल्या जातात परंतु कोणत्याही योजना वेळेवर पुर्ण केल्या जात नाही. उत्सव झाल्यानंतर मिळाल्यावर उपयोग काय? अशी प्रतिक्रिया कुटुंबधारकांकडून व्यक्त केली जात आहे.