| श्रीवर्धन | वार्ताहर |
एचडीएफसी बँक श्रीवर्धन शाखा व श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लिपंचतन शाखा याठिकाणी कॅश लावणार्या एजन्सीच्या कर्मचार्यानी दुप्पट आमिषाच्या लोभाने एटीएमची रक्कम चोरली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सिक्युर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड या मुंबई भांडुप येथील एटीएमला कॅश पुरवणार्या एजन्सीच्या कर्मचार्यांनी अपहार केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी श्रीवर्धन पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून पोलीस कोठडी मिळवल्यानंतर सदर आरोपीकडून पोलिसांनी चौकशी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील कोलाड येथील एक महिला व माणगाव येथील एक पुरुष यांनी सदरची रोकड दाम दुप्पट करून देतो. असे आमिष दाखवून रोकड लावणार्या कंपनीच्या कर्मचार्यांकडून सदरची रोकड घेतल्याची वृत्त आहे.
सदर एजन्सीच्या कर्मचार्यांनी आपल्याला दुप्पट पैसे मिळतील व पैसे दुप्पट झाल्यानंतर आपण मुद्दल असलेली रक्कम पुन्हा एटीएम मध्ये लावू, या आशेने सदर दामदुप्पट करून देणार्या लोकांकडे सदरची रक्कम दिली. परंतु चार-पाच दिवसांनंतर सुद्धा रक्कम परत न मिळाल्यानंतर, एचडीएफसी बँकेच्या शाखेत पैसे लावलेच नसल्याचे लक्षात आल्यानंतर, हरेश वाघमारे रा.तळेगाव, माणगाव यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यांमध्ये रितसर फिर्याद दिली होती. आता या प्रकरणातील एक महिला आरोपी व पुरुष आरोपी यांचा शोध श्रीवर्धन पोलीस घेत आहेत. सदर दोन आरोपींना अटक झाल्यानंतरच या प्रकरणाचा पूर्णपणे खुलासा होईल. अशी माहिती श्रीवर्धन पोलिसांकडून देण्यात आली आहे.