चोरलेल्या वस्तू चोराकडून परत

कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरात केली होती चोरी

| नेरळ | वार्ताहर |

आधी घरात चोरी करून नंतर त्याच चोरलेल्या वस्तू परत ठेवत चोरट्याने घर मालकाची माफी मागितली असल्याचा प्रकार समोर आला. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरात ही चोरी झाली असून, अज्ञात चोरट्याने चोरलेल्या वस्तू परत करीत असल्याची एक भावनिक पोस्ट घराच्या भिंतीवर लिहिल्याने माहिती समोर आली. नेरळ पूर्व परिसरात गंगानगर येथील पद्मश्री नारायण सुर्वे विद्यापीठ ह्या घरात चोरी झाली. दरम्यान, ही चोरी चर्चेचा विषय बनली.

प्रसिद्ध ज्येष्ठ कविवर्य नारायण सुर्वे यांचा इतिहास सर्वांना माहीतच आहे. नारायण सुर्वे यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी इ.स. 1998चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. कविवर्य नारायण सुर्वे हे आता हयात नाहीत.2010 मध्ये त्याचं वृद्धपकाळाने मृत्यू झाला. ते राहात असलेल्या नेरळ येथील गंगानगर परिसरातील पद्मश्री नारायण सुर्वे विद्यापीठ ह्या घरात त्यांची मुलगी आणि जावई वास्तव्यास असून, आठवणी जपून आहेत. सुजाता उर्फ कल्पना गणेश घारे हे दाम्पत्य दहा दिवसांसाठी आपल्या मुलाकडे मुंबई विरार येथे गेले होते. दरम्यान, ह्याच घरावर रेकी ठेवून बसलेल्या चोरट्याने घारे घरात नसल्याचा फायदा घेत रविवार 14 जुलै रोजी बंद घर फोडून चोरी केल्याचे उघड झालं. अज्ञात चोरट्याने शौचालयाच्या खिडकीतून घरात प्रवेश मिळवत घरातील किमती सामान चोरण्याचा प्रयत्न केला. घरातील कपाटात दागदागिने, पैसे सापडून न आल्याने शेवटी या चोरट्याने घरातली एलईडी टीव्ही, तांबे-पितळेच्या मौल्यवान वस्तू, भांडी तर किराणा कडधान्य, मसाला, तांदूळदेखील चोरून नेले. काही शर्ट पिस, कपडे चोरल्याचेदेखील समजतंय. गेली दोन ते तीन दिवस हा चोर घरातील वस्तू चोरून नेत असल्याचा अंदाज लावण्यात आला.

एकूणच, अज्ञात चोरट्याला ह्या घरात काही भिंतीवरील फोटो आणि काही सत्काराच्या ट्रॉफी, पुरस्कार सर्टिफिकेट ह्या दिसून आल्यानंतर चोरट्याला कविवर्य स्वर्गीय नारायण सुर्वे यांचे घर असल्याचे समजलं. त्यानंतर चोरट्याने भावूक होत, मला माहीत नव्हते की हे नारायण सुर्वे यांचं घर आहे, नाहीतर मी चोरी केलीच नसती, मला माफ करा, मी जी वस्तू घेतली आहे ती मी परत करेल, मी टीव्ही पण नेला होता तो आणून ठेवला आहे, सॉरी, अशी पोस्ट भिंतीवर लिहून ठेवल्याचे नारायण सुर्वेंची मुलगी सुजाता घारे यांनी सांगितले आहे. या चोरीची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version