प्रवाशांकडून कठोर कारवाईची मागणी
। कर्जत । प्रतिनिधी ।
धावत्या रेल्वे गाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, या घटनांमुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात येत आहेत. शुक्रवारी (दि. 4) अशाच एका प्रकारात लोकमान्य टिळक टर्मिनस-चैन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेसवरील दगडफेकीत कर्जत येथील तेजस्विनी बाळाराम भोईर (24) ही तरुणी गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्विनी बाळाराम भोईर ही तरुणी ठाणे येथील एका शिपिंग कंपनीत ज्युनियर ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. ती दररोज चैन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेसने ठाणे ते कर्जत असा प्रवास करते. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता ती ठाणे स्थानकातून महिलांच्या डब्यातून खिडकी शेजारील सिटवर बसून आपल्या मैत्रींणींसह प्रवास करत होती. गाडी कल्याण स्थानक पार करून विठ्ठलवाडी स्थानकाच्या पुढे संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आली असता अचानक डाव्या बाजूने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गाडीवर दगड भिरकावला. हा दगड खिडकीतून आत येऊन तेजस्विनी हिच्या डोक्याला लागल्याने रक्तस्राव सुरू झाला.
या घटनेमुळे डब्यातील प्रवाशांमध्ये घबराट उडाली. काही प्रवाशांनी तत्काळ ट्रेनची चैन खेचली, त्यामुळे गाडी विठ्ठलवाडी आणि अंबरनाथ स्थानकांदरम्यान थांबली. यानंतर ट्रेन मॅनेजरने याबाबत रेल्वे प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर कर्जत रेल्वे जिआरपीच्या कर्मचाऱ्यांनी तेजस्विनी हिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यापूर्वीही पनवेल स्थानकानंतर प्रगती एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याने एका प्रवाशाचा डोळा कायमचा निकामी झाला होता. मात्र, अशा घटनांकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत आहे.
या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, रेल्वे प्रशासन आणि सुरक्षायंत्रणांनी यापुढे तरी जागरूक राहावे आणि या गंभीर घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.