। जेएनपीटी । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील करळ-सावरखार ग्रामपंचायत हद्दीतील जेएनपीटीच्या 15 हेक्टर पाणथळी क्षेत्रात दगड मातीचा भराव करण्यात आला आहे. जलकुंभावर मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले माती-दगडाच्या भरावाचे काम उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी रविवारी (दि.12) बंद केले आहे. तरी उरण तहसीलदारांनी रॉयल्टी वसूल करावी, अशी मागणी उरणच्या जनतेनी केली आहे. करळ सावरखार ग्रामपंचायत हद्दीतील जेएनपीटी येथील 15 हेक्टर पाणथळी क्षेत्रात जलकुंभावर मोठ्या प्रमाणावर माती-दगडाच्या भरावाचे काम सुरू केले आहे. जलकुंभांवर दररोज शेकडो ट्रक माती दगड टाकला जात आहे. या भरावात स्थलांतरित पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होऊ लागली. तसेच मासेमारीसाठी पाण्याचा प्रवाहाच्या खाड्यांची मुखही बंद केली जात आहेत. परिणामी परिसरातील पाणथळ जागा दफन केल्याने येथील नाजूक पर्यावरणीय समतोल बिघडला आहे. भरावामुळे पाण्याचा प्रवाह रोखला जात असल्याने पारंपरिक मासेमारीही धोक्यात आली आहे. या भरावामुळे स्थलांतरित पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होऊ लागली असल्याने पर्यावरणवाद्याकडून चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री, पर्यावरण विभागाकडे ई-मेलद्वारे तक्रार करण्यात आली होती. रविवारी उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी या स्थळाची पाहणी केली. करळ-सावरखार ग्रामपंचायत येथील जेएनपीटीच्या 15 हेक्टर पाणथळी क्षेत्रातील जलकुंभावर मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले माती-दगडाच्या भरावाचे काम पाहणीनंतर बंद केले असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.