। अलिबाग । भारत रांजणकर ।
एसटी कर्मचार्यांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन चिघळत असून गुरुवारी अलिबाग आगारातून सुरू केलेल्या अलिबाग- पेण एसटी बसवर वडखळजवळ दगडफेकीची दुर्दैवी घटना घडली आहे. अलिबाग- पेण बसवर अज्ञाताने दगडफेक केल्याने कर्मचार्यांसह प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे तात्काळ खळबळ उडाली असून एसटीतील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
राज्यात काही ठिकाणी संपकरी कर्मचार्यांनी एसटीवर दगडफेक केल्याने जनतेतून संताप व्यक्त होत असताना आता हे लोन रायगडपर्यंत येऊन ठेपले आहे. त्यामुळे जिल्ह्यातून देखील संताप व्यक्त केला जात आहे. ज्या एसटीच्या जीवावर पोट भरले जात आहे, त्याच एसटी बसवर दगडफेक होणे हे कृतघ्नपणाचे उदाहरण असल्याचे मत आगारप्रमुख अजय वनारसे यांनी व्यक्त केले. हेच होणार असेल तर मग ती वेतनवाढ देखील नसलेली बरी, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान वडखळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी दिलेल्या चालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दगडफेक करुन अज्ञात घटनास्थळावरून पसार झाले होते. त्यामुळे नेमकी कोणी व कशासाठी दगडफेक केली हे समजू शकले नाही. दगडफेकीनंतर एसटीत असणारे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत का? याबाबत चालक व वाहक यांनी खात्री करून प्रवाशांची विचारपूस केली.