महाड वनविभागाकडून कातसदृश्य खडे जप्त

| महाड | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसापासून जंगली वनस्पतीपासून तयार करण्यात आलेले कातसदृश्य पदार्थ व पावडरची तस्करी होत असल्याची माहिती महाड वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाकडून मुंबई-गोवा महामार्गावर पाळत ठेवण्यात आली होती. पोलादपूर येथील वनविभागाच्या तपासणी नाक्यावर दोन ट्रक जात असताना त्यांना थांबवण्यात आले. ट्रकची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये कातसदृश्य खडे व पावडरच्या गोणी आढळून आल्या. ट्रकमधील गोणी व त्यातील कात फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती महाड वनक्षेत्रपाल यांनी दिली.

इंडोनेशियावरून आयात करण्यात आलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्टमधून वनपोज (कातसदृश्य खडे आणि पावडर) यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. मुंबई-गोवा महामार्गावरून दोन ट्रकमधून वनपोजची विनापरवाना वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती महाड वनविभागाला मिळाली होती. त्यानंतर महामार्गावर पाळत ठेवण्यात आली असता महामार्गावरून जाणार्‍या दोन ट्रकचा (चक 08 -झ / 1716 आणि चक 08- ॠ/1716) संशय आल्याने पोलादपूर येथील वनविभागाच्या तपासणी नाक्यावर ट्रक अडवण्यात आले, त्याची तपासणी केली असता ट्रकमध्ये वनपोजने भरलेल्या गोणी आढळून आल्या.

सर्व गोणी जप्त करण्यात आल्या असून ट्रक चालक दीपक किशोर घोसाळकर राहणार बोरज ता. खेड आणि सचिन मंगेश कदम राहणार खोपी, ता. खेड यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेला वनपोल फॉरेनसिक लॅब मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला असून त्याची किंमत बाजार मूल्याप्रमाणे एक कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती वनक्षेत्रपाल यांनी दिली.

Exit mobile version