बर्गर न मिळाल्याने बसवर दगडफेक; सहाजण जखमी

| खोपोली | वार्ताहर |

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर फुडमॉलमध्ये बर्गर न मिळाल्याने प्रवासी आणि हॉटेल मालक यांच्यात वादावादी झाली. त्याचे पर्यवसान बसवर दगडफेकीत झाले. हा प्रकार रविवारी रात्री खालापूर टोल नाक्याच्या पुढे घडला. यामध्ये सहाजण जखमी झाले. आरोपीना रात्रीच ताब्यात घेण्यात आले आहे.

एकविरा भक्तगण परतीचा प्रवास करीत असताना फुडमाल हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी प्रवासी वर्गाने गोल्डन बर्गरची ऑर्डर केली. मात्र या हॉटेलमध्ये बर्गर उपलब्ध नसल्याने प्रवाशांची हॉटेल मालकाबरोबर शाब्दिक बाचाबाच झाली. उपलब्ध नसणार्‍या वस्तू मेनूकार्डमध्ये छापून फसवणूक का करता असा सवाल उपस्थित करीत असताना येथील कर्मचारी वर्ग व प्रवाशांमध्ये जोरदार चकमक झाल्याने वाद विकोपाला गेला. त्यामुळे येथील कर्मचारी वर्गाकडून बसवर दगडफेक करण्यात आल्याचे समोर आले.

सुरुवातीला दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ही दगडफेक करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र वाहतूक पोलीस,खोपोली व खालापूर पोलीस तसेच द्रुतगती मार्गावरील आपत्कालीन यंत्रणांनी अधिक तपास केल्यावर द्रुतगती मार्गावरील हॉटेल फूडमॉलमध्ये बसमधील पर्यटक प्रवासी व हॉटेल व्यवस्थापक यांच्यात टोकाची बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती होताच पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली व फूडमॉल व्यवस्थापक व यातील काही संशयित व्यक्तींना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या घटनेत जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत. यातील दोषींवर कडक कारवाई होईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी सांगितले.

Exit mobile version