सीमावासियांवरील अत्याचार थांबवा- आ.जयंत पाटील

मुंबई | दिलीप जाधव |
कर्नाटकातील सीमा भागात मराठी भाषिकांवरचे अत्याचार थांबले पाहिजे,अशी जोरदार मागणी शेकाप आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे . त्यामुळे सीमाभागातल्या मराठी भाषिक जनतेवर अन्याय होत असताना केंद्र सरकारने याबाबतीत हस्तक्षेप करायला पाहिजे अशा प्रकारचा ठराव सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत मांडत कर्नाटक सरकारचा निषेध केला.
जयंत पाटील यांनी सकाळच्या सत्रात हा मुद्दा उपस्थित करत सरकारनं भूमिका मांडण्याची मागणी केली होती.सीमा भागातल्या मराठी भाषक जनतेचा लोकशाही मार्गाने लढा सुरु असताना कर्नाटक सरकार मराठी भाषिक जनतेवर अन्याय, मुस्कटदाबी, मराठी शाळा बंद पाडणे, कानडीची सक्ती असे प्रकार करत आहे,असेही आम.जयंत पाटील यांनी निदर्शनास आणले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना संतापजनक असून या सगळ्या घटनांचा राज्य सरकारच्या वतीने निषेध करत असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारच्या भूमिकेला समर्थन दिले. महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा जिथे येईल तिथे विरोधी पक्षाचे समर्थन असेल मात्र याविषयी राजकारण करून या मुद्यांचे गांभीर्य घालवू नये,असे प्रविण दरेकर यांनी सांगितले .

Exit mobile version