एआयएमआयएमची मागणी
। नवी मुंबई । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला खोळंबा नको म्हणून गेली अनेक वर्षे गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहतूक बंद करण्यात येत होती. मात्र, यावर्षी गणेशोत्सव दोन दिवसांवर येवून ठेपला असतानाही अवजड वाहतूक सुरूच आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास प्रवाशांसह चाकरमान्यांना होत असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणी एआयएमआयएमचे कोकण विभाग प्रभारी तथा विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र महासचिव हाजी शाहनवाज खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच या मागणीची प्रत राज्याचे उपमुख्यमंत्री, महामार्ग पोलीस आयुक्त आणि रायगड पोलीस अधीक्षकांना देखील पाठविण्यात आल्या आहेत.
4 सप्टेंबर 2024 रोजी नागोठणे ते कोलाड रस्त्यावरील खिंडीमध्ये अवजड वाहन बंद पडल्याने दीड किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यातच कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना नाहक त्रास होत आहे. प्रति वर्षी गणेशोत्सव काळात मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात येत असते, मात्र मुंबई-गोवा महामार्गाच्या मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौर्यामुळे अवजड वाहतूक बंद करणे राज्य सरकार विसरले आणि याचाच फटका प्रवासी वर्गाला बसत आहे.
मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वास येण्याची चिन्हे अद्यापही धूसरच आहेत. माणगाव येथील बायपास सुरू न केल्यामुळे वाहनांच्या 3 किलोमिटर पर्यंतच्या रांगा लागल्याने कोकणातील जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार मुंबई गोवा महामार्गाचे काम 3 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. पर्यायाने काही ठिकाणी एका लेनवरून दुतर्फा वाहतूक सुरू करण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य प्रवाशांसह कोकणकरांना होत आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळापर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक तत्काळ बंद करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली आहे.