‘दांड-मोहोपाडा रस्त्यावरील अवजड वाहतूक थांबवा’

| रसायनी | वार्ताहर |

रसायनी पाताळगंगा परिसरातील अतिरिक्त एमआयडीसीत अनेक कारखाने उभे राहात आहेत. त्यामुळे या ठिकाणी अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. दांड-रसायनी रस्त्यावरील मोहोपाडा मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. शिवाय, लहान-मोठे अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे परिसरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश खराडे यांनी केली आहे. मोहोपाडा ते मिनीडोअर थांब्यापर्यंत रोजच वाहतूककोंडी होत आहे. मोहोपाडा थांब्यापासूनचा रस्ता अरुंद असल्यान कोंडीत भर पडत आहे. रसायनी व आसपासच्या परिसराची मोहोपाडा ही मुख्य बाजारपेठ असल्याने बाजारहाट करण्यासाठी परिसरातील नागरिक येत असतात. यावेळी वाहने रस्त्याशेजारी लावून वाहतूक खोळंबा करतात. मोहोपाडा ते चांभार्ली या परिसरात नवीन बाजारपेठेसाठी एमआयडीसीने जागा उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे राकेश खराडे यांनी सांगितले.

Exit mobile version