| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे धुळ, वायु, हवा प्रदुषण होत आहे. या प्रदूषणामुळे रायगडकरांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. पर्यावरणाच्या नावाखाली जेएसडब्ल्यू, रिलायन्स कंपनी वृक्षारोपणाचे उपक्रम राबवित आहेत. मात्र पर्यावरणाचा समतोल बिघडण्याऐवजी दिवसेंदिवस बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या जिल्ह्याच्या प्रदुषणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी माजी आ. पंडित पाटील यांनी केली आहे.
प्रदुषणामुळे होणारा जिवाशी खेळ थांबवा, असेदेखील पंडित पाटील म्हणाले. रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरत आहे. वर्षाला दहा लाखापेक्षा अधिक पर्यटक जिल्ह्यात येतात. पर्यटनातून जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार मिळू लागला आहे. अनेक हॉटेल, कॉटेज व्यवसायिकांना उभारी मिळत आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या जिल्ह्याला पर्यटक अधिक पसंती देत असताना, जिल्ह्यातील कंपन्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे समोर आले आहे.
अलिबाग-पेण मार्गावर प्रवास करताना धुर, धुळीचे साम्राज्य वडखळ परिसरात निर्माण झाले आहे. जेएसडब्ल्यू, रिलायन्स कंपनीच्या परिसरात असलेल्या धुर, धुळ प्रदूषणामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्तेवर असलेले प्रतिनिधीकडून बघ्याची भुमिका घेतली जात आहे. प्रदुषणामुळे पर्यटनावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील कंपन्यांमार्फत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले मात्र, हे उपक्रम फक्त दिखावा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळून आहे. प्रत्यक्षात आरोग्याच्या दृष्टीने कंपनी व्यवस्थापनांकडून ठोस भुमिका घेतली जात नसल्याचा आरोप माजी आ. पंडित पाटील यांनी केला आहे. प्रदुषणामुळे स्थानिकांसह पर्यटकही त्रस्त होऊ लागले आहेत. याबाबत प्रशासनानेदेखील गांभीर्याने दखल घ्यावी, असे पंडित पाटील यांनी सागंगितले.