नकाराला झुगारून निर्धाराला प्राधान्य

। सायली पाटील । अलिबाग ।
कितीदा जरी नकार आला,
समजाविले तिने तिच्या मनाला,
नकार जरी भारदस्त झाला,
प्राधान्य दिले तिने आवडीला.
या ओळींचं तंतोतंत अनुकरण करत जसं एखाद्याने आयुष्य जगावं अगदी तसच आयुष्य जगणार्‍या, घरच्यांच्या बोलण्यापलीकडे जाऊन स्वत:ची आवड जोपासणार्‍या, आयुष्याकडे अपेक्षेच्या नव्हे तर आवडीच्या दृष्टीकोनातून पाहणार्‍या, स्वत:ची आवड जोपासत स्वत:चं अस्तित्व निर्माण करणाय्रा एका नवदुर्गेची कहाणी. ही कहाणी आहे जगाच्या बोलण्याला न जुमानता स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपड करणार्‍या अलिबाग मधील परहूरपाडा येथील नम्रता म्हात्रे या नवदुर्गेची.
परहूरपाडा येथे राहणार्‍या नम्रता म्हात्रे या आशा सेविका म्हणून काम करतात. कोणाचच आयुष्य हे साधं-सोप, खाचखळगे नसणारं अजिबात नसतं. कधी-कधी कोणाची परिस्थिती नसते तर कधी-कधी कोणाला आयुष्याची साथ मिळत नसते. नम्रता यांनासुद्धा शिक्षणाची फार आवड होती परंतु घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्याने इयत्ता पाचवीनंतर लगेचच त्यांना शाळा सोडावी लागली. परंतु एखाद्या गोष्टीची अगदी मनापासून आवड असली तर कधी-कधी शिक्षणाचीही गरज भासत नाही, हेच खरे.
कमी शिक्षण, घरच्यांचा नकार, बिनपगारी नोकरी या सर्व गोष्टी असतानादेखील कशालाही न जुमानता स्वत:च्या आवडीला प्राधान्य देऊन पाहिलेलं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. आशा सेविका म्हंटलं की पगार हा नसतोच त्यामुळे जेव्हा काम असेल त्यावेळेस फक्त कामाप्रमाणे ठरलेलं
मानधन तेवढं मिळतं. पण, आपण जी नोकरी करतोय ती बिनपगाराची, फक्त मानधनावर असणारी नोकरी आहे. हे माहीत असतानादेखील घरातले पाठवत नसतानासुद्धा बालमृत्यू व मातामृत्यू थांबावेत यासाठी त्यांनी आशा सेविका म्हणून काम करायला सुरूवात केली.
कोरोनापूर्वी आशा सेविका या फक्त बालमृत्यू व मातामृत्यू थांबावेत यासाठीच काम करीत होत्या. परंतू, कोरोनाकाळात तर सर्वप्रकारची कामे करायला त्यांनी सुरूवात केली. अँटीजन टेस्ट असो, घरोघरी जाऊन तपासणी असो, लसीकरणाविषयी माहिती देणे व लसीकरणासाठी जाणे ही सर्व धावपळीची कामेदेखील त्या करत आहेत. आशा सेविकांना पगार नसतो पण मानधन असते. परंतु, कोरोनाकाळात केलेल्या अनेक कामांचं त्यांना अजून मानधनही मिळालेलं नाही. तरीसुद्धा कोणतीही तक्रार न करता या कामाची आवड असल्याने त्या या कामामध्ये स्वत:ला पूर्णपणे झोकून देऊन कार्यरत आहेत.

मला माहेरून व सासरहून अनेकदा कामावर कशाला जायला हवयं? नको जात जाऊस असं अनेकदा आजही सांगतात. परंतु मला या कामाची आगोदरपासूनच फार आवड असल्याने मी हे काम शेवटपर्यंत करतच राहणार आहे. मला या कामात आनंद वाटतो. त्यामुळे मी हे काम करणे कधीच सोडणार नाही.
नम्रता म्हात्रे, परहूरपाडा

Exit mobile version