अनिता कोलते यांचे असामान्य शैक्षणिक कार्य
बेघर मुलांची घेतात शाळा
पनवेल । संजय कदम ।
आजच्या घडीला इंग्रजी माध्यमांच्या शाळा, सर्व सुविधायुक्त शैक्षणिक संकुल आणि तेथे आपल्या पाल्याला शिक्षण देण्याच्या अनुषंगाने पालकांची धडपड सुरू असते. तो एक स्टेटस सिम्बॉल झाला आहे. मात्र आजही अनेक शाळाबाह्य मुले शिक्षणापासून वंचित आहेत. त्याचे शासनाला काहीही पडलेले नाही. अशा चिमुकल्यांसाठी अनिता कोलते यांनी पुढाकार घेतला आहे. कळंबोली सर्कल येथील पुलाखाली त्या बेघर मुलांची शाळा भरवतात. आणि त्यांना शिक्षणाचे धडे देतात. या नवदुर्गेने खर्या अर्थाने निरक्षर आणि साक्षरते मध्ये एक प्रकारे पूल जोडला आहे. हे सामाजिक व शैक्षणिक कार्य नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अधिक अधोरेखित होते
शासनाने शाळा बाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा संकल्प जरूर केला आहे. त्यासाठी थोड्याफार प्रमाणात प्रयत्न सुद्धा झाले. मात्र आजही अनेक विद्यार्थी शाळेपासून बाहेर आहेत. शिक्षण आणि त्यांचा काडीमात्र संबंध नसतो हे प्रत्यक्ष दिसून येत आहे. पालकांचा स्थलांतरित पणा त्याचबरोबर अशिक्षित मानसिकता आणि गरिबी याशिवाय अनेक अनेक कारणांमुळे मुलांना सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांप्रमाणे शाळेत जाता येत नाही. परिणामी ती पिढी सुशिक्षित होण्यास अनेक अडचणी येतात. कित्येक ठिकाणी हे वास्तव दृष्टिक्षेपात पडते. कळंबोली उड्डाणपुलाखाली अशा प्रकारे अनेक बेघर कुटुंब हातात. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाप्रती असणारे आवड आणि समाजाच्या ऋणातून काहीसे उतराई होण्याच्या उद्देशाने अनिता कोलते यांनी पुलाखाली अशा विद्यार्थ्यांसाठी बिनभिंतीची शाळा सुरू केले आहे. या मुलांना लिहिता वाचता यावे ते साक्षर व्हावेत या उद्देशाने ही आगळी वेगळी शाळा पुलाखाली भरत आहे.
मुलांना इंग्रजीचे व इतर विषयांचे प्राथमिक शिक्षण मी त्यांना देते. स्वतःची नोकरी सांभाळत तसेच पदरमोड करुन त्या आपल्या पतिसह हा स्तुत्य उपक्रम राबवित आहे. या गरीब मुलांचे पालकही त्या पुलाखाली राहतात. त्यापैकी बहुतांश जण डोंबारी समाजाचे आहेत.
अनिता कोलते