खारघर वाहतूक विभागाचा अजब कारभार

नादुरुस्त वाहनाला ‘जामर’, तर रस्त्यावर फळ विक्री करणार्‍या वाहनाना मात्र अभय

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

खारघर वाहतूक विभागातर्फे खारघर वसाहतीत नो पार्किंग क्षेत्रात उभ्या राहणार्‍या वाहनांवर कारवाई करण्याचे काम करण्यात येत असते. मात्र, त्याच वेळी रस्त्यावरच वाहन लावून व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांकडे मात्र वाहतूक विभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करत असून, सामान्यांच्या वाहनांवर कारवाई करणारे कर्मचारी नो पार्किंग क्षेत्रात वाहन उभी करून व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांवर मेहेरबानी का दाखवत आहे, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करत आहेत.


खारघर वाहतूक विभागाच्या अजब कारभाराचे चित्र शनिवारी (ता.24) पाहायला मिळाले. वसाहतीत राहणारे रमेश कदम काही कामानिमित्त सेक्टर 12 परिसरात आपले वाहन घेऊन गेले होते. यावेळी वाहनात अचानक बिघाड झाल्याने ते आपले वाहन रस्त्याच्या कडेला लावून वाहन दुरुस्ती करणार्‍याच्या शोधात निघून गेले. खारघर वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक विभागाकडून सम आणि विषम पद्धतीने पार्किंगची सोय करण्यात आली आहे. कदम यांचे वाहन बंद झालेल्या ठिकाण सम विषम पद्धतीमुळे नो पार्किंग क्षेत्रात उभे होते. तसेच कदम त्या वेळी वाहनाजवळ उपस्थित नसल्याने वाहतूक विभागाचे कर्मचारी कदम यांच्या वाहनाला जॅमर लावून गेले. मात्र, त्याच वेळी कदम यांच्या वाहनाच्या मागील आणि पुढील भागात काही पावलांच्या अंतरावर वाहने उभी करून फळ विक्री करणार्‍या वाहनांवर मात्र कारवाई करण्यात न आल्याने नो पार्किंग क्षेत्रात वाहन उभी केली म्हणून कारवाई झालेले वाहन चालक संताप व्यक्त करत होते.

रस्त्यांवर व्यावसायिकांचे अतिक्रमण
खारघर वसाहतीमधील सर्वच अंतर्गत रस्ते आणि पदपथ बेकायदेशीरपणे व्यवसाय करणार्‍यांनी व्यापले आहेत. बंद अवस्थेत असलेली वाहने घेऊन एकाच ठिकाणी ती उभी करून खाद्यपदार्थ तसेच फळांची विक्री करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सुरु असलेल्या या व्यवसायांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून आणि वाहतूक विभागाकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, कारवाई होत नसल्याने बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍यांचे फावले आहे.

वाहतूक विभागाकडून वसाहतीमध्ये नो पार्किंग क्षेत्रात उभ्या राहणार्‍या सर्वच प्रकारच्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. त्यामध्ये व्यावसायिकांच्या वाहनाचादेखील समावेश आहे.

योगेश गावडे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खारघर वाहतूक विभाग


संपर्कहीन जॅमर
वाहतूक विभागाकडून कारवाई करताना लावण्यात येणार्‍या जॅमरवर संबंधित विभागाचा संपर्क क्रमांक अथवा वाहतूक विभागाचे कार्यालय कुठे आहे याची माहिती असणे गरजेचे आहे. जेणे करून बाहेरून आलेल्या वाहन चालकांना वाहतूक विभागाशी संपर्क करणे शक्य होऊ शकेल. खारघरमध्ये कारवाई करताना लावण्यात आलेल्या जॅमरवर मात्र कोणत्याही प्रकारचे संपर्क क्रमांक नसल्याचे पाहायला मिळाले.

Exit mobile version