पनवेल महानगरपालिकेचा अजब कारभार

रोज बाजाराकडून शुल्क; आठवडे बाजार मात्र निःशुल्क

| पनवेल | वार्ताहर |

रोज बाजारामध्ये नियमितपणे व्यवसाय करणार्‍या विक्रेत्यांकडून पनवेल महानगरपालिकेने शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. परंतु, दुसरीकडे बेकायदेशीररित्या भरवण्यात येणार्‍या आठवडे बाजार निःशुल्क पद्धतीने भरत आहे. याबाबत पथविक्रेता तथा शहर फेरीवाला समितीच्या बैठकीमध्ये लक्ष वेधण्यात आले. समितीचे सदस्य सचिन गायकवाड यांनी हा मुद्दा उपस्थित करीत संबंधितांकडूनही शुल्क वसूल करावे, अशी मागणी केली.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विशेष करून सिडको वसाहतींमध्ये आरक्षित जागेवर रोज बाजार सुरू आहेत. कळंबोलीमध्ये अशा प्रकारचे दोन रोज बाजार आहेत. याव्यतिरिक्त इतर वसाहतींमध्येसुद्धा आरक्षित भूखंड महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. येथेही रोज बाजार भरवण्यात येणार आहेत. कळंबोलीत राखीव भूखंडावर फेरीवाले आता व्यवसाय करू लागले आहेत. दरम्यान, पनवेल महानगरपालिकेच्या महासभेमध्ये रोज बाजारात व्यवसाय करणार्‍यांना शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी सध्या कळंबोलीत सुरू झाली आहे. या शुल्कला काही प्रमाणात विरोध केला असला तरी याबाबत महापालिका प्रशासन ठाम आहे.

रोज बाजारातील विक्रेत्यांकडून शुल्क घेणे हे नियमात बसण्यासारखे असले तरी आठवडे बाजार मात्र मोकाट आहेत. सिडको वसाहतीमध्ये दररोज एका ठिकाणी वसुली दादा आठवडे बाजार भरवत आहेत. मोकळ्या भूखंडांवर काही ठिकाणी रस्त्यांवर हा बाजार भरवला जातो. मुंबईमधून वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करणारे विक्रेते या बाजारात येतात. वसुली दादा त्यांच्याकडून पैसे घेऊन महिन्याला लाख रुपयांची कमाई करतात. यामध्ये काही शासकीय यंत्रणांचेसुद्धा हात माखले आहेत. त्यामुळे संबंधितांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.

दरम्यान, पनवेल महानगरपालिका पदपथावर व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई करत आहे. तसेच रोज बाजारात विक्री करणार्‍यांकडून शुल्क वसूल करत आहे. मात्र बेकायदेशीररित्या आठवडे बाजारांना कोणतेही शुल्क महानगरपालिका प्रशासनाकडून लावण्यात येत नाही. त्यामुळे मनपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यांनी केलेला कचरा महापालिकेचा आरोग्य विभाग उचलत आहे. तेथील रस्तेसुद्धा मनपा साफ करत आहे. मात्र, संबंधित आठवडे बाजाराकडून प्रशासनाला कोणतेच उत्पन्न मिळत नाही. या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या फेरीवाला समितीच्या बैठकीमध्ये समितीचे सदस्य सचिन गायकवाड यांनी शुल्काबाबत मुद्दा उपस्थित केला. आठवडे बाजारात विक्रीसाठी आलेल्यांकडून महापालिकेने नियमानुसार शुल्क आकारावे, अशी मागणी त्यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली. जर महानगरपालिकेने शुल्क आकारले तर संबंधित विक्रेते दुसर्‍यांना पैसे देणार नाहीत. आणि यामधून होणारी बेकायदेशीर वसुली थांबेल, असे मत शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत गायकवाड यांनी व्यक्त केले.

ना फेरीवाला क्षेत्र जाहीर करा
पनवेल महानगरपालिकेने सिडको वसाहतींमध्ये ना फेरीवाला क्षेत्र जाहीर केले नाही. तशा आशयाचे फलकसुद्धा लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे साहजिकच फेरीवाले कुठेही व्यवसाय करीत आहेत. त्यांच्यावर निर्बंध आणि बंधन नसल्याने रस्ते आणि पदपथ काबीज करण्यात आले आहेत. तसेच आठवडे बाजारसुद्धा त्या ठिकाणी भरत आहे. विशेष करून कामोठे वसाहतीत ना फेरीवाला क्षेत्र जाहीर करावे, अशी मागणी सचिन गायकवाड यांनी केलेली आहे.

Exit mobile version