निकषात नसताना अन्य बचत गटाची धान्य दुकानासाठी निवड
| अलिबाग | प्रतिनिधी |
रास्त भाव दुकानासाठी लागणाऱ्या निकषात बसत नसतानादेखील अन्य महिला बचत गटाची दुकानासाठी निवड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या या अजब कारभाराबाबत माजी आ. पंडित पाटील आक्रमक झाले. योग्य ती कार्यवाही तातडीने करा, अन्यथा तीव्र भूमिका घेतली जाईल, असा इशारा पंडित पाटील यांनी दिला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी पडताळणी करून कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
कर्जतमधील तालुक्यातील बारणे गावातील भक्ती महिला बचत गट, श्री सदगुरू कृपा स्वयं सहाय्यता महिला बचत गट, एकविरा आई महिला बचत गट, श्री राम समर्थ स्वयंसहाय्यता महिला बचत गटांनी रास्त भाव दुकानासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात प्रस्ताव दाखल केला होता. त्यामध्ये ज्येष्ठत्वाच्या निकषासह अन्य कागदपत्रे देण्याचे नियम लागू केले होते. त्यानुसार या महिला बचत गटांनी कागदपत्रे पुरवठा अधिकारी कार्यालयात दिली.
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने रास्त भाव दुकानासाठी श्री राम समर्थ महिला बचत गटाची निवड केली. ही निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप भक्ती महिला बचत गटाने केला आहे. ज्येष्ठत्वाच्या निकषात भक्ती महिला बचत गटाची स्थापना 2010 ची असून श्रीराम समर्थ बचत गटाची स्थापना 2018 ची आहे. रास्त भाव दुकानासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने योग्य पध्दतीन अवलोकन केले नसल्याचा आरोप भक्ती महिला बचत गटांनी केला आहे. ही बाब माजी आ. पंडित पाटील यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी नुकतीच जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांची भेट घेतली. कागदपत्रांची पूर्तता आणि ज्येष्ठत्वाच्या निकषात बसत असतानाही भक्ती महिला बचत गटाची निवड का केली नाही, असा सवाल पंडित पाटील यांनी केला. यावेळी सर्जेराव यांनी कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे सांगितले. मात्र, दिलेल्या अर्जाबरोबरच घेतलेल्या पोच पावतीमध्ये कागदपत्रांची पूर्तता असल्याचे पंडित पाटील यांनी दाखवून दिले. सर्जेराव यांना धारेवर धरताच पाहणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. बेकायदेशीर निवडीबाबत योग्य ती कार्यवाही केली नाही, तर न्यायालयात धाव घेतली जाईल, अशा इशारा पंडित पाटील यांनी दिला.