स्थानिक मजुरांना डावळून परप्रांतियांना दिली कामे
आत्मनिर्भर प्रक्रियेला केराची टोपली
। आंबेत । वार्ताहर ।
ग्रामीण भागातील मजुरांना शासनाने ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत यासाठी अनेक शासकीय विभागाने ग्रामपंचायत स्तर व इतर यांना कामाचे नियोजन करण्याची सूचना देखील दिलेल्या आहेत मात्र म्हसळा श्रीवर्धन तालुक्यातील खामगाव, तळा, यांसह अन्य मजुरांना वनविभागाकडून कामे देताना सापत्नपणाची वागणूक दिली जात आहे.
अंतर्गत कामे मिळावी यासाठी तेथील कामगार वर्गाने संबंधित रेंजर म्हसळा श्रीवर्धन यांना मागील काही महिन्यांपूर्वी आपल्याला संबंधित कामे मिळण्याकरिता अर्ज देखील केला होता. मात्र एवढं करून देखील स्थानिक कामगार संघटनांच्या पत्राला केराची टोपली दाखविली आहे. मजूरांचे अर्ज रद्दीत जमा होत असल्याची भाषा संबंधित म्हसळा वनविभागाकडून वापरली गेली आहे. संबंधित वनविभाग अधिकार्यांनी परप्रांतीय मजूरांना कामे दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे शासनाच्या जीआर मध्ये मजुरांना घेऊन ही कामे करण्याचे नियम असून हेच काम वनविभाग वृक्ष लागवडीकरीता जेसीबीच्या साहाय्याने खड्डे खोदत आहे त्यामुळे कुंपनच शेत खात असल्याचं विदारक चित्र सध्या म्हसळा श्रीवर्धन विभागात समोर येत आहे.
तालुक्यात सुरू असलेले काम हे शासनाच्या टक्केवारीनुसार होत असून शासनाचा टक्का हा कामगार वर्गाच्या टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचा दावा देखील खामगाव येथील कामगार करत आहेत. एकीकडे परप्रांतीय ठेकेदार करत असलेल्या कामांचा दर्जा देखील सुरळीत नसून बोगस झालेल्या भापट, ताम्हणी करंबे, वांगणी, तोंडसुरे येथील बंधार्यांच्या कामात स्टीलचा वापर न करता निव्वळ दगडांचाच वापर करीत असल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी वार्तालाप करताना व्यक्त केला आहे. त्यामुळे म्हसळा, श्रीवर्धन वनविभाग संबंधित कामांमध्ये स्थानिकांना डावलून मनमानी कारभार करत आहे. काम नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.
वनविभाग अंतर्गत सुरू असलेल्या रोजगार हमीच्या कामात आमच्या सारख्या गरीब कामगारांना डावलून वनविभागाला परप्रांतीय मजुरांकडून जास्त टक्केवारी मिळत असल्याने आमच्या सारख्या सामान्य कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. -सदाशिव पवार, स्थानिक मजूर
म्हसळा तालुक्यातील स्थानिक नागरिकांवर होत असलेला अन्याय हा चुकीचा आहे वनविभाग हा स्थानिकांच्या रोजगारावर उठला असून स्थानिकांना कामे न मिळण्याचा संकल्पच सध्या म्हसळा श्रीवर्धन वनविभागाचा दिसून येत आहे. – एकनाथ खामगावकर, उपसरपंच-खामगाव
