नियंत्रण कक्षातील फोन बंद ठेवण्याचा प्रताप उघड
| अलिबाग | प्रतिनिधी |
ठिकठिकाणी कचरा, खड्डे पडलेले अशा अनेक समस्यांच्या गर्तेत अलिबाग एसटी बस स्थानक सापडत आहे. त्यात आणखी एक भर पडली आहे. अलिबाग स्थानकातील वाहतूक नियंत्रक कक्षातील फोनमधील रिसिव्हर काढून ठेवण्याचा प्रताप उघड झाला आहे. एसटी बस आगारातील हा अजब कारभार समोर आला आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकात बसची माहिती घेण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या प्रकाराविरोधात प्रवासी वर्गात नाराजी निर्माण झाली असून, संबंधित वाहतूक नियंत्रकाविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एसटी महामंडळाचे एसटी बस आगार व स्थानक आहे. या स्थानकातून हजारो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना एसटीची माहिती मिळावी, म्हणून स्थानकात वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. या कक्षामध्ये फोन आहे. 222006 या क्रमांकाचे फोन नंबर आहे. या फोन नंबरवर संपर्क साधून प्रवासी एसटी बसची माहिती घेतात. परंतु, हा फोन अनेक वेळा बंद असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अलिबाग आगार व्यवस्थापकांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. आगार व्यवस्थापकांच्या गलथान कारभाराचा फटका प्रवाशांना कायमच बसत असतो. वाहतूक नियंत्रण कक्षात असलेल्या फोनवर कोणीही संपर्क साधू नये म्हणून वाहतूक नियंत्रकाने त्या फोनवरील रिसिव्हर काढून फोन बंद ठेवल्याचा प्रताप उघड झाला आहे. या प्रकारामुळे प्रवासी वर्गात नाराजीचे सुर उमटले आहेत. एसटी आगारातील वाहतूक नियंत्रकांच्या या प्रकारामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या वाहतूक नियंत्रकांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
