| सोगाव | वार्ताहर |
अलिबाग-रेवस मार्गावर रेवस बायपास ते विद्यानगर दरम्यान भररस्त्यात मोकाट गुरांनी ठिय्या मांडला आहे. त्यामुळे या मार्गावर वाहन चालकांना प्रवास करताना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. गुरे भररस्त्यात ठिय्या मांडून बसत असल्यामुळे अपघातात वाढ होत आहे.
अलिबाग शहर हे रायगड जिल्ह्याची राजधानी असल्याने या शहरामध्ये विविध शासकीय, निमशासकीय, जिल्हा न्यायालय, पोलीस स्टेशन, पोलीस मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड जिल्हा परिषद, तहसीलदार कार्यालय व विविध प्रकारची अनेक कार्यालये तसेच विविध प्रकारच्या शासकीय व खासगी रुग्णालयात जिल्हाभरातील विविध भागातून हजारोंच्या संख्येने येणाऱ्या नागरिकांना व वाहनचालकांना मोकाट गुरांमुळे वाहतूक कोंडी होऊन नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय वारंवार अपघात होत असल्याने वाहनचालकांचे प्रसंगी गुरांचे देखील अपघातामुळे मार लागून दुखापत होत आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन गुरांना निष्काळजीपणे रस्त्यावर मोकाट सोडणाऱ्या गुरांच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ही गुरे रात्रीच्या अंधारात या भागात रस्त्यावर बसून अथवा फिरत असल्याने वाहनचालकांच्या लगेच लक्षात येत नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. तरी गुरे मालकांनी याची दखल घेणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे, तसेच गुरे रस्त्यावर मोकळे न सोडण्याचे आवाहन देखील जागृत नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.