| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतमधील भटक्या कुत्रांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यात भटक्या कुत्रांच्या बंदोबस्तबाबत देखील कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. अशातच मंगळवारी एका शालेय विद्यार्थ्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. या भागात सतत कुत्र्यांमुळे हल्ले होत असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव स्थानिकांसाठी डोकेदुखी बनला आहे. या भटक्या कुत्र्यांनी अनेक लहान मुलाला घेतला चावा घेतला आहे. दरम्यान स्थानिक ग्रामस्थ आणि लहान मुलांचे या भटक्या कुत्र्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी उमरोली ग्रामपंचायतीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून सतत केली जात आहे.
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या उमरोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये उमरोली, आषाणे, पोतदार वसाहत, पाली वसाहत, डिकसळ या गावाच्या प्रस्त अनेक भटकी कुत्री आढळून येत आहेत. त्यात नव्याने या भागात येणाऱ्या कुत्र्यांची संख्या मोठी आहे. त्यात प्रामुख्याने या भागात कुत्रे आणून सोडले जात असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या हॉटेलमधील उष्टे खाणे खाण्यासाठी कुत्रे एकत्र जमत असल्याचे दिसून येत आहे. या भटक्या कुत्र्यांनी आतापर्यंत 10 लोकांच्या हातापायाचे लचके ओढले आहेत. त्यातच शाळेत जाणाऱ्या वेद संजय रसाळ या विद्यार्थ्यांवर झडप घातली आणि त्याला जखमी केले. सध्या या जखमी मुलावर रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.






