रायगड जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरू लागले आहे. यावर ठोस उपाय म्हणून रायगड जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील चेंढरे, थळ व चौलमधील 207 मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण, शस्त्रक्रिया व श्वानदंश प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असून, ही मोहीम जिल्ह्यात राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शाम कदम यांनी दिली.
रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात ठिकठिकाणी कुत्र्यांचा झुंड दिसून येतो. अनेक वेळा हे कुत्रे माणसांवर एकत्रित हल्ले करीत असतात. त्यामुळे जीव गमविण्याची भीती अधिक असते. काही वेळा दुचाकीवरून प्रवास करीत असताना कुत्रे अंगावर आल्याने अपघात होण्याची भीतीदेखील असते. गावे, वाड्यांमध्ये कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्यावर ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकांना, विशेष करून लहान मुलांना दहशतीच्या खाली राहावे लागत आहे.
जानेवारी 2022 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत चार हजार 176 जणांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती उपलब्ध झाली असून, एक हजार 204 जणांना उपचारासाठी दाखल केले आहे. तर, दोन हजार 972 जणांवर बाह्य रुग्ण कक्षात उपचार केल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषदेकडून 25 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. पुणे येथील युनिर्वसल अॅनिमल वेलफेअर या एजन्सीला हे काम देण्यात आले आहे. 25 फेब्रुवारीपासून या कामाला सुरूवात केली आहे. यासाठी पेणमध्ये एक सेंटर उभारण्यात आले आहे. मोकाट कुत्र्यांना पकडणे, त्यांना त्या सेंटरमध्ये आणणे, निर्बिजीकरण, शस्त्रक्रिया करणे, त्यांची उत्पत्ती थांबविण्यासाठी व रेबीजपासून बचाव करण्यासाठी श्वान दंश प्रतिबंधित लसीकरण देण्याचे काम सुरु केले आहे.
ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाणार आहे. त्यासाठी सुरुवाताली अलिबाग तालुक्यातील चेंढरे, चौल व थळ ग्रामपंचायतीची निवड केली आहे. आतापर्यंत 207 कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्यात आले आहे. सध्या चौलमध्ये हे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.
शहरातील कुत्र्यांवर ही होणार कारवाई अलिबाग शहरात ठिकठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. पादचार्यांसह दुचाकी चालकांना या कुत्र्यांचा त्रास अनेकवेळा झाला आहे. मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, अलिबाग नगरपरिषदेमार्फतदेखील या कुत्र्यांवर आता कारवाई केली जाणार आहे. कुत्र्यांवर कारवाई करण्यासाठी पाचवेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पुन्हा निविदा मागविण्यात आली होती. पुणे येथील युनिर्वसल अॅनिमल वेल्फेअर संस्थेची निविदा मंजूर करण्यात आली आहे. शहरातील मोकाट कुत्र्याच्या निर्बिजीकरणाचे काम सुरु करण्यात आले असल्याची माहिती अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक अंगाई साळुंखे यांनी दिली.