श्रमदानातून रस्त्यावरील झाडी सफाई

| दिघी । वार्ताहर ।

श्रीवर्धन तालुक्यातील दांडगूरी – धनगर मलई मार्गावरील मुख्य मार्गावर दोन्ही बाजूने वाढलेल्या झाडीमुळे वाहन चालक तसेच प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. यासाठी नागलोली ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी पुढाकार घेत श्रमदानातून रस्त्यावरील झाडी हटवत रस्ता वाहतुकीस सुरक्षित केला आहे.

दांडगूरी फाटा ते धनगरमलई पर्यंत हा मार्ग डोंगराळ व आडमार्ग असल्याने दुर्लक्षित आहे. हाच मार्ग तालुक्याला मिळत असल्याने याचा वेळोवेळी प्रवासासाठी फायद्याचा ठरत आहे. परंतु रस्त्या लगतच्या वाढलेल्या झाडीमुळे वाहन चालकांना वाहन चालवणे अतिशय जोखमीचे झाले होते. या मार्गावर अपघाताचे संकट ओढू नये, म्हणून ग्रामपंचायतीने योग्य ती दखल घेऊन नागलोली ग्राम पंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी मिळून रस्त्या लगतच्या वाढलेल्या झाडाची साफ सफाई केली.

ग्रामस्थांनी एकजुटीने आपल्या श्रमदानातून एका दिवसात सात कि.मी.च्या रस्त्याची झाडी तोडून स्तुत्य उपक्रम राबविला आहे. कोणत्याही शासकीय निधीची व अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पुढार्‍यांची वाट न पाहता ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडी तोडून सर्वासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. नागलोली, बोर्ले, बोर्ले रसाळवाडी, देवखोल, नवीवाडी आणि धनगरमलाई इत्यादी गावातील साधारणपणे 50 हुन अधिक ग्रामस्थांनी यावेळी झाडी साफ केली.

Exit mobile version