प्रकाशासाठी मोबाईलच्या बॅटरीचा वापर; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव नगरपंचायतीच्या खांदाड आणि लगतच्या सिद्धी नगर परिसरात गेल्या पाच-सहा महिन्यांपासून पथदिवे बंद असल्याने नागरिकांना दररोज अंधारातून वाट काढावी लागत आहे. सायंकाळ होताच रस्त्यांवर पसरलेल्या काळोखामुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील वर्दळीच्या भागातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, बंद पथदिवे येत्या दोन-तीन दिवसांत दुरुस्त करून सुरू करण्यात येतील, असे आश्वासन माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी शुक्रवारी (दि.16) दिले आहे.
या परिसरातील रस्ता नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्यासाठी महत्त्वाचा आहे. डॉ. चंद्रशेखर यांचे माहेर मॅटर्निटी हॉस्पिटल याच परिसरात असल्याने गर्भवती महिला, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या मार्गावरून ये-जा करतात. अशा वेळी रस्त्यावर पुरेसा प्रकाश नसल्यास त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
अंधारमय रस्त्यांवरून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ येऊ नये. महिलांना निर्भयपणे घरी परतता यावे, रुग्णांना रुग्णालयापर्यंत सुरक्षितपणे पोहोचता यावे आणि प्रत्येक नागरिकाचा रात्रीचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी नगरपंचायतीने तातडीने पावले उचलावीत. काही नागरिक मोबाईलच्या बॅटरीचा वापर करतात, तर काहींना रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकींच्या हेडलाईटच्या प्रकाशाचा आधार घ्यावा लागतो.
महिलांना सुरक्षितपणे घरी पोहोचण्यासाठी टॉर्चचा आधार घ्यावा लागणे, ही केवळ गैरसोय नाही; तर नागरी सुविधांच्या उपलब्धतेबाबत विचार करायला लावणारी बाब आहे. रस्त्यावरील खड्डे, समोरून येणारी वाहने किंवा अचानक उद्भवणारी परिस्थिती अंधारात लक्षात येणे कठीण होते. खांदाड आणि सिद्धी नगरमधील सर्व बंद पथदिवे दिलेल्या मुदतीत सुरू करून नियमित देखभालीची व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
तलाव परिसरातील मगरींचा वावर
बाळा डीजे यांच्या घरासमोर तसेच वालेराव यांच्या निवासस्थानामागे मोठे जलसाठे आहेत. ऑक्टोबरमधील उष्णतेमुळे पाण्याची पातळी कमी होत असल्याचे सांगितले जाते. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या तलावांच्या परिसरात मध्यम आकाराच्या मगरींचा वावर जाणवत असून, रात्रीच्या सुमारास पाण्यात हालचालींचे आवाजही ऐकू येतात.
