| पोलादपूर | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांनी दिलेल्या निर्देषानुसार पोलादपूर तालुक्यात ‘वंदे मातरम्’ गीताचा शुक्रवारी (दि.7) शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ महाड संचलित चोळई येथील सुंदरराव मोरे महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर समूह गायनासह आयटीआय पोलादपूरच्या पथनाट्याद्वारे देशभावना प्रकट करणारा ठरला.
यावेळी पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, गटशिक्षणाधिकारी सुभाश साळुंखे, शिवाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. संतोश काळे, सुनील बलखंडे, चारूलता बढीये तसेच वंदे मातरम समूह गायन संयोजन समिती सदस्य शैलेश पालकर, प्रमोद दीक्षित, शिरीश साबळे, प्रिती बुटाला, अस्मिता पवार, दिलीप साबळे, अरुणा भागवत, संजय कळंबे, गिरीधर दरेकर, सुभाष अधिकारी, स्मिता पवार, किसन सुरवसे, मुख्याध्यापक साळुंखे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पोलादपूर येथील नरवीर तानाजी मालुसरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलादपूर आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्याकडून वंदे मातरम गीताची निर्मिती, स्वातंत्र्यलढ्यातील वंदे मातरमचे महत्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतात वंदे मातरम गीताकडून आपल्या नागरिकांना प्राप्त होणारी प्रेरणा असा आशय असणारे पथनाट्य प्रभावीपणे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.






