पथविक्रेता समितीचे आरक्षण जाहीर

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरूड-जंजिरा नगरपरिषदेच्या नगर पथविक्रेता समिती निवडणूक 2026 ची महिला आरक्षण सोडत पार पडली. ही सोडत नगरपरिषद कार्यालयातील सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी राखी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीमधील नोंदणीकृत पथविक्रेत्यांमधून 8 जणांच्या नगर पथविक्रेता समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. या समितीमधून तीन जागा महिलांसाठी राखीव असून, त्याकरिता सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी राखी गावडे यांनी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक व विकलांग/दिव्यांग या नावाच्या पाच चिठ्ठ्या बनविण्यात आल्या होत्या. त्यातील पहिली चिठ्ठी इतर मागासवर्ग महिला, तर दुसरी चिठ्ठी अल्पसंख्याक महिला या नावाची उचली गेली. त्यामुळे आता सर्वसाधारण 3, अनुसुचित जाती 1, अनुसुचित जमाती 1, इतर मागासवर्ग 1, अल्पसंख्याक 1 आणि विकलांग/दिव्यांग 1 असे आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी अनिकेत जगदाळे, संजय बामुगडे, प्रकाश आरेकर, सुदेश माळी, सतिष जंजिरकर, आशितोष पाटील, अरविंद गायकर, देवेन सतविडकर आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version