डाकेलीत हनुमान मंदिराचे उद्घाटन
| कोर्लई | वार्ताहर |
हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर येथील हनुमान मंदिराचे उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे, याचा मनोमन आनंद होत आहे. जो जो शब्द दिला, तो पाळला आहे. दिलेला शब्द पाळण्याची, काम करण्याची ताकद शेकापक्षात आहे. त्याप्रमाणे आपलीदेखील पक्षाशी बांधिलकी असावी. यातूनच आपले नाते अधिक दृढ होईल, असा विश्वास शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी मुरुड तालुक्यातील डाकेली येथे हनुमान मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका सहचिटणीस सी.एम. ठाकूर, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वामन चुनेकर, मुरुड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रमेश नागावकर, अजित कासार, शरद चवरकर, शरद वरसोलकर, रमेश दिवेकर, विकास दिवेकर, काकळघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष कांबळी, बोर्ली सरपंच डॉ. चेतन जावसेन, उपसरपंच मतीन सौदागर, भोईघर सरपंच काशिनाथ वाघमारे, रिझवान फहीम, मनोहर भोपी, सुरेश मोरे, सुरेश नांदगावकर, दीपक पाटील, शशिकांत पारवे, मंगेश थळे, सीताराम ठाकूर (गुरुजी), दीपक कांबळी तसेच डाकेली ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दत्तात्रय घेवडे, महिला मंडळ अध्यक्षा सुलोचना बागडे, मुंबई मंडळ अध्यक्ष सुभाष घडशी व पदाधिकारी, शिक्षक वृंद व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला दीपप्रज्ज्वलन, श्रीगणेश पूजन करून माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन व नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. यावेळी पंडित पाटील यांचा गाव उपाध्यक्ष काशिनाथ मोहिते व महिला मंडळ अध्यक्षा सुलोचना बागडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
गाव कसे सुंदर असावे, सुशोभित असावे, याचे डाकेली गाव उत्तम उदाहरण असून, गावाच्या विकासासाठी शे.का.पक्षाने ग्रामीण भागात माध्यमिक शाळा सुरू करून येथील मुलांना शिक्षणाचे दालन खुले केले आहे. याच शाळेतून डॉक्टर, इंजिनिअर, वकील निर्माण झाले आहेत. याचे श्रेय खर्या अर्थाने शेकाप चिटणीस आ. जयंत पाटील यांच्याकडे असल्याचा उल्लेख गावाचे उपाध्यक्ष उमेश धनावडे यांनी आपल्या प्रास्ताविकात करून गाव एकसंघ राहण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, तसेच गाव व्यसनमुक्त व्हावा, अशी भावना व्यक्त केली.
ग्रामपंचायत हद्दीतील कार्यक्षेत्रात शेतकरी कामगार पक्षाने अनेकविध योजना राबवून समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तालुका सहचिटणीस सी.एम. ठाकूर यांनी आपल्या मनोगतात सांगून सर्वांनी एकत्रित राहण्याचे आवाहन केले. यावेळी डाकेली महिला मंडळाच्या लेझीम पथकाने कला सादर करुन केलेल्या स्वागताने भारावून गेलो असल्याचे पंडित पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश नांदगावकर यांनी, तर संतोष कांबळी यांनी आभार मानले.