उर्दू माध्यमाच्या शाळांना बळकटीकरण

35 शिक्षकांची नियुक्ती; रायगड जिल्हा परिषदेच्या पाठपुराव्याला यश

| खास प्रतिनिधी | रायगड |

रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यम शाळांना शिक्षकांची कमतरता भेडसावत होती. ही समस्या निकाली निघाली असून, जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये 35 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून, त्यांना पदस्थापना देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यम शाळांमधील शिक्षण व्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत मिळणार आहे.

जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यम शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे करण्यात येते होते. यामुळे रायगड जिल्ह्याला 44 शिक्षक मिळावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आली होती. यानुसार जिल्ह्यात 35 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये उर्दू माध्यमाच्या 127 शाळा असून, या शाळांमध्ये 4 हजार 922 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापूर्वी उर्दू माध्यमाच्या 244 शिक्षक कार्यरत होते. आत्ता नव्याने 35 शिक्षकांची नेमणूक करण्यात आल्याने जिल्ह्यात उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये 279 शिक्षक झाले आहेत.
दरम्यान, उर्दू माध्यमाच्या शाळांना शिक्षक मिळावेत यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला होता.

कोणत्या शाळेत किती शिक्षक?
नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या 35 शिक्षकांची नियुक्ती ही शाळांमधील विद्यार्थी संख्या व शिक्षक संख्या यानुसार करण्यात आली आहे. त्यानुसार अलिबाग तालुक्यातील 3, कर्जत 10, खालापूर 1, माणगाव 6, महाड 7, पोलादपूर 1, म्हसळा 5, श्रीवर्धन 1, तळा 1 यानुसार नवीन शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली आहे.
Exit mobile version