। जेएनपीटी । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील उरण-पनवेल व जेएनपीटी महामार्गावर अवजड कंटेनर, ट्रेलर पार्किंग करणार्यांच्या वाहनांवर वाहतुक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महामार्गावर उभ्या करण्यात येणार्या अवजड कंटेनर, ट्रेलरमुळेच मोठमोठे अपघात व वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने महामार्गावरील अवजड वाहनांवर ऑनलाईन दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गायकवाड यांनी हाती घेतली आहे. यामध्ये पनवेल-जेएनपीटी महामार्गावरील एल डी टोलनाका, धुतुम, आय ओ टी एल सह अन्य महामार्गावरील बेकायदेशीर पार्किंग हटविण्याची मोहीम हाती घेतल्याने तालुक्यातील महामार्ग मोकळे होऊ लागले आहेत. पनवेल-जेएनपीटी हा सर्वात जास्त अवजड वाहतुकीच्या रहदारीचा महामार्ग असून, या महामार्गावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात कंटेनर, ट्रेलर पार्किंग करीत असल्याने नियमित वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान महामार्गावरील पार्किंग करणार्या अवजड वाहनांवर ऑनलाईन दंडात्मक कारवाईमुळे प्रवासी वाहतुकीचा अडथळा दूर होण्यास मदत होऊ लागली आहे. उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड, संजय पवार, संजय जाधव, शेंडे, निता डाऊर, विशाल भिसे या वाहतूक पोलिस पथकाने उरण तालुक्यातील रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणार्या अवजड वाहनांवर कायदेशीर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.