…तर पुन्हा कडक लॉकडाऊन अटळ; आयसीएमआरचा इशारा

येत्या फेब्रुवारी, मार्चमध्ये करोना संक्रमणाची तिसरी लाट?
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
करोना संक्रमित रुग्णांचा आकडा खाली घसरत जाणं ही देशासाठी सर्वात आनंददायक बातमी आहे. मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 18,346 करोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 209 दिवसांमधील हा सर्वात कमी आकडा ठरलाय. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही मार्च 2020 नंतर सर्वात कमी आहे. मात्र, संक्रमण दर घटत असल्यानं नागरिक गाफील राहिले तर देशाच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ होऊ शकते, अशी शक्यता ’इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’नं व्यक्त केलीय.

आयसीएमआर आणि लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजच्या संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासानुसार, ’रिव्हेंज ट्रॅव्हल’मुळे भारताला करोना संक्रमणाच्या तिसर्‍या लाटेचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे, पुन्हा एकदा देशाला लॉकडाऊनची गरज भासू शकते. उल्लेखनीय म्हणजे, एकीकडे देशात लॉकडाऊनचं ग्रहण उठत असतानाच दुसरीकडे वाढत्या करोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय.
गेल्या दीड वर्षांपासून घराबाहेर पडणं शक्यतो टाळणार्‍या व्यक्ती येत्या काही महिन्यांत फिरण्याची संधी साधू शकतात. यामुळेच विमान तिकीटं आणि हॉटेलचं बुकींग मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून येतंय. या पार्श्‍वभूमीवर, पर्यटकांशिवाय स्थानिक रहिवासी आणि प्रशासनाला आपली जबाबदारी वेळीच ओळखावी लागेल, असा इशारा आयसीएमआरकडून देण्यात आला आहे.

Exit mobile version