पर्यवेक्षकांच्या मोबाईलचे सुरु राहणार कॅमेरे; प्रत्येक वर्गात असणार सीसीटीव्ही
| रायगड | प्रतिनिधी |
इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा पूर्णत: कॉपीमुक्त होण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ठोस नियोजन केले आहे. सर्व केंद्रांना वॉल कंपाऊंड असणार आहे. परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असतील. याशिवाय केंद्रावरील प्रत्येक पर्यवेक्षकाचा मोबाईल झूम ॲपच्या माध्यमातून जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात असणाऱ्या परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आदेशानुसार नियोजन सुरू असून, रायगड जिल्हा परीषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी सज्ज झाला आहे.
यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यात 75 केंद्रे असणार आहेत. दुसरीकडे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची 52 परीक्षा केंद्रे आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक 23 जानेवारीपासून सुरु होईल. तत्पूर्वी, प्रत्येक परीक्षा केंद्राची गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात आली आहे. ज्या केंद्रांवर किंवा वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, त्याठिकाणी बसविण्याचे आदेश देण्यात आले. वॉल कंपाऊंड तुटलेले होते, त्याठिकाणी तारेचे कपांऊंड मारण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सरमिसळप्रमाणेच या वर्षीपासून पर्यवेक्षकांचीही सरमिसळ केली जाणार आहे.
शहरातील पर्यवेक्षक दुसऱ्या शाळांमध्ये तर ग्रामीणमधील पर्यवेक्षक तालुक्यातील दुसऱ्या केंद्रांवर नेमले जाणार आहेत. ओळखीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत सैल सोडण्याचे प्रकार होऊन नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांच्या मोबाईलचे कॅमेरे सुरु ठेवून तेथील हालचालींवर जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी लक्ष ठेवणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचेही असणार परीक्षेवर लक्ष
इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त होणार आहे. त्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. वॉल कंपाऊंड असलेल्याच केंद्रांना मान्यता देण्यात आली आहेे. परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांना पेपर संपेपर्यंत झूम ॲपच्या माध्यमातून त्यांच्या मोबाईलचे कॅमेरे सुरु ठेवावे लागणार आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या नियंत्रण कक्षातून जिल्हाधिकारी परीक्षेवर लक्ष ठेवणार आहेत.
बारावीची प्रात्यक्षिक 23 जानेवारीपासून
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तथा तोंडी चाचणी 23 जानेवारीपासून सुरु होईल.तर दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरु होईल. त्यांचे प्रात्यक्षिक 2 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यात व्यस्त आहेत.







