रूद्रची हत्या करणार्‍याला कठोर शिक्षा करा; समाजबांधवांची मागणी

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील बोर्ले गावातील दोन वर्षे तीन महिने वयाच्या बालकाचे अपहरण करून त्याची हत्या करणार्‍या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी तालुक्यातील सर्व धर्मीय समाज बांधवांनी करीत तशा प्रकारचे निवेदन माणगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांना गजानन अधिकारी, राजू मोरे व सहकार्‍यांनी दिले. मयत बालक रुद्र यादव याची शोकसभा मंगळवारी (दि.2) बोर्ले गावात घेण्यात आली. यावेळी सर्वधर्मीय समाजबांधव उपस्थित होते. यावेळी माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम, रामभाऊ टेंबे, काका नवगणे, शंकर पवार, विष्णु सावंत, चंद्रकांत राऊत, संताजी पवार, सुरेश गायकवाड, नामदेव कासारे, निजाम फोपलूनकर, विठोबा मोरे यांच्यासह सर्वधर्मीय समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत निवेदन तयार करण्यात येवून घटनेतील आरोपी संतोष अशोक यादव या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करीत तसे निवेदन माणगाव तालुक्यातील सर्व धर्मीय समाज बांधव यांनी एकत्रित येत माणगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांना दिले. तसेच यातील आरोपी संतोष यादव याला 48 तासांत रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर व त्यांचे सर्व सहकारी, स्थानिक गुन्हा अन्वेषण खात्याचे पथक यांनी पकडल्याने सर्व धर्मीय बांधवांनी या सर्वांचे कौतुक केले.

Exit mobile version