84 वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई

| कल्याण/वसई | प्रतिनिधी |

महावितरणच्या वसई पूर्व उपविभागात व्यापक शोध मोहिमेत एकाच दिवसात 84 वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत 15 लाख 9 हजार 300 रुपये किंमतीची 80 हजार 372 युनिट विजेची चोरी उघडकीस आणण्यात आली आहे. महावितरणच्या 16 पथकांनी 17 ऑगस्टला धानीव बाग, पेल्हार, वाकणपाडा, शिवाजीनगर, वसई फाटा, सोपारा फाटा, दांगडेपाडा, जाधवपाडा, गावदेवी, धानीव भागात व्यापक शोध मोहिम राबवली. एकूण 757 वीज जोडण्यांची तपासणी यात करण्यात आली. त्यात 84 जणांकडे विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळले.

त्यानुसार संबंधिताना चोरीच्या विजेचे देयक व तडजोडीची रक्कम भरण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. विहित मुदतीत या रकमेचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध वीज कायदा-2003 च्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल होण्यासाठी फिर्याद देण्यात येणार आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा आणि दंडाची तरतूद असून कोणत्याही परिस्थितीत विजेचा अनधिकृत वापर टाळावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व वसई मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता प्रवीण सुटे, वसई पूर्वचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीश भगत, सहायक अभियंते सचिन येरगुडे, नितिन पाटील, निकुंज वैष्णव, कनिष्ठ अभियंता महेंद्र आघाव व त्यांच्या टिमने ही कारवाई केली.

Exit mobile version