| पनवेल | वार्ताहर |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सिडकोने अतिक्रमणविरोधी मोहिमेचा जोर वाढविला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत शुक्रवारी पनवेल परिसरातील दोन बेकायदा पार्किंग झोनवर धडक कारवाई करण्यात आली.
कारवाईत तब्बल 17,200 चौ.मी. क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. विशेष म्हणजे विमानतळ परिसरातील पायाभूत सुविधा, सुरक्षेची काळजी तसेच शिस्तबद्ध पार्किंगसाठी मोहीम राबविण्यात आल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. या अंतर्गत कळंबोली जंक्शन परिसरातील रस्त्यालगतची तात्पुरती वाहनतळे व अव्यवस्थित पार्किंग झोन हटवण्यात आले. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मैंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अनधिकृत बांधकाम विभागाचे नियंत्रक लक्ष्मीकांत डावरे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबवली.
सिडकोकडून अवैध वाहनतळाचे भूखंड मोकळे
पनवेल सेक्टर 18 मधील सुमारे 4,700 चौ. मी. भूखंडावर उभारलेले बेकायदा पार्किंग आणि त्यातील वाहने हटविण्यात आली. याशिवाय सेक्टर 3 मध्ये 12,200 चौ. मी. क्षेत्रफळ व्यापून बसलेल्या अवैध वाहनतळावर ही बुलडोझर फिरवण्यात आला. सिडकोच्या मते, शहरातील वाढते अतिक्रमण व अनधिकृत पार्किंग ही मोठी समस्या बनली आहे. विमानतळासारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने अशा पार्किंग झोनमुळे अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी ही कारवाई हाती घेण्यात आली.







