1 कोटी 1 लाख 90 हजार 497 लाखांचा मुद्देमाल जप्त
| रायगड | खास प्रतिनिधी |
विधानसभा निवडणूक सन 2024 च्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून दि.15 ऑक्टोबर ते दि. 12 नोव्हेंबरपर्यंत एकूण 324 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 240 आरोपींना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण कारवाईमध्ये एक लाख 58 हजार 531 लीटर दारु जप्त करण्यात आली असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत एक कोटी एक लाख 90 हजार 497 आहे.
विधानसभा निवडणूक-2024 आचारसंहिता कालावधीत या विभागाची सात पथके तैनात करण्यात आली आहेत. पथकांकडून आंतरराजीय मद्य तस्करी होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर हातभट्टी दारु निर्मिती व विक्री केंद्र यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारची अवैध मद्य वाहतूक होणार नाही. याकरिता रायगड विधानसभा मतदारसंघात शेडूंग, ता. पनवेल व चांढवे, ता. पोलादपूर येथे दोन तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी संशयित वाहनांची सखोल तपासणी करण्यात येत आहे, तसेच अवैध मद्यविक्री करणारे ढाबे/हॉटेल/टपर्या यांच्यावर वारंवार कारवाई करण्यात येत असून, अशा हॉटेल/ढाबे मालक /चालक यांच्यासह जागा मालकांवर गुन्हे नोंद करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच या निवडणूक कालावधीत गोवा राज्यातून गोवानिर्मित मद्याची चोरटी वाहतूक रेल्वे प्रशासनाच्या रो-रो सेवेव्दारे वाहतूक होण्याची शक्यता असल्याने कोलाड येथे रो-रो रेल्वे सेवेव्दारे येणार्या वाहनांची पोलीस विभाग व रेल्वे प्रशासन यांच्याशी समन्वय साधून तपासणी करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणूक 2024 मुक्त व निर्भयपणे पार पाडावी याकरिता विधानसभा मतदारसंघात मतदारांना दारुचे प्रलोभन देत असल्याचे निदर्शनास आल्यास तसेच अवैध मद्यनिर्मिती व विक्रीबाबत काही तक्रारी असल्यास या विभागाचा व्हॉट्सअॅप क्र. 8422001133 व टोल फ्री क्र.18002339999 वर संपर्क संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रविकिरण कोले यांनी केले आहे.