। उरण । वार्ताहर ।
उरणमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत कल्पना देऊनही ठोस उपाययोजना होत नाही. त्याच्या निषेधार्थ उरण शिवसेना पक्षाच्या पदाधिकार्यांनी वीज कार्यालयावर धडक देत जाब विचारला.
उरण परिसरात विजेचा लपंडाव व कर्मचारी वर्गाचा मुजोरपणा याचा त्रास येथील जनतेला सहन करावा लागत होता. मात्र वीज बिल भरमसाठ येत आहेत. त्याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही वीज मंडळाचे अधिकारी वर्ग दखल घेत नव्हते, यामुळे जनतेत वीज अधिकारी वर्गा विरोधात जनतेत संतापाची लाट पसरली होती. याची दखल उरण शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षानी घेत जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरण वीज कार्यालयावर धडक देत याचा जाब विचारण्यात आला. यावेळी उरण शहरातील यार्ड व इतर आर्थिक लागेबांधे असलेल्या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा आरोप करीत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी अधिकारी वर्गावर करण्यात आला. तसेच पाऊस न पडता ही दिवसांतून अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी कार्यकारी अभियंता धनंजय सातपुते व विजय सोनावले यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.