कंत्राटी वीज कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील महावितरण कंपनीच्या खोपोली डिव्हिजनमध्ये कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे अखेर 20 कंत्राटी कामगारांनी ‘कामबंद’ आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, याबाबत पनवेल उपविभागीय अधिकारी शिवाजी वायफळकर यांच्याशी संपर्क केले असता उद्या पगार होईल, असे त्यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महावितरणमध्ये फक्त पगाराचा विषय नसून, कंत्राटी कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचेही कंत्राटी कामगारांनी सांगितले. ठेकेदाराशी जेव्हा ही पगाराची चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. ठेकेदाराकडून अद्यापही कामगारांना पेमेंट स्लीप तसेच टीएनपी दिली जात नसून, प्रत्येक वर्षी पावसाळी रेनकोटदेखील मिळत नसल्याचे कंत्राटी कामगारांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. एवढेच नव्हे तर फिल्ड वर्क करताना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा, अवजारे ठेकेदाराकडून पुरविण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले.
तीन महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने विकास कांबळे, कृष्णा पाटील, संतोष व्होला, मनोहर राठोड, सम्राट मोरे, नामदेव भला, महेंद्र निरगुडा, अरविंद कांबळे, राम हिंदोला, विजय खंडवी, ज्योती खराल, अमर माळी, दीपक राठोड, नारायण ठोंबरे, अक्षय पिंगळे, सखाराम ठोंबरे, मनोज राठोड, बाळकृष्ण जाधव, पद्माकर वाघ, बारक्या पवार हे कामगार कामबंद करीत आंदोलनावर गेले आहेत.
दरम्यान, कंत्राटी कामगारांच्या तक्रारी लक्षात घेत ठेकेदाराशी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहितीसाठी घेतली असता, महावितरणचे ठेकेदार मधुप सिंग शगुन म्हणाले की, माझे रोहा व खालापूर, खोपोली या ठिकाणी लेबर सप्लाईचे काम आहे. रोहा डिव्हिजनमधून मला वेळोवेळी बिल मिळते, त्यामुळे रोह्यातील कामगारांना पगार वेळेवर देता येतो. पण खोपोली (खालापूर) डिव्हिजनमधून मला गेल्या तीन महिन्यांपासून बिल मिळालेले नाही व तसेच माझ्या बँकेच्या खात्यात पैसे नसल्याने मी कामगारांचे पगार करू शकलेलो नाही. खोपोली डिव्हिजनमधून नेहमीच बिल वेळेवर मिळत नाही, यामुळे कामगारांची ओढाताण होते. महावितरण कंपनीने बिल दिले की लवकरच कामगारांना पगार दिले जातील, असेही शगून म्हणाले.

Exit mobile version