गेला आवाज कुणीकडे?

अतुल गुळवणी

अलिबाग -पुणे…ज्या प्रवाशांना अलिबाग, पेण, खोपोली, लोणावला या मार्गावर प्रवास करायचा असेल अशा प्रवाशांनी फलाट क्रमांक 2 वरील 1343 या गाडीत बसावे.असा सुपरिचित आवाज कानी पडला की समस्त सर्वसामान्य प्रवाशांच्या नजरेसमोर येते ती लालपरी. गेली साठ वर्षे हा आवाज तीन पिढ्यांच्या कानात गुंजत राहिला आहे. त्यामुळे या आवाजाशी सर्वसामान्यांची एक वेगळीच नाळ जुळली आहे.

वाट पाहिन,पण एसटीनं जाईन, अशी एक म्हणही मोठ्या अभिमानाने बोलली जाते. कारण एसटी म्हणजे सर्वसामान्यांचे हक्काचे वाहन.एसटी म्हणजे विश्‍वास आणि एसटी म्हणजे सर्वसामान्यांना परडवणारे भाडे. या त्रिसुत्रीमुळे सर्वसामान्यांमध्ये एसटीविषयी नेहमीच आपुलकी निर्माण होत आलेली आहे.पण गेले महिनाभर ही लालपरी सर्वसामान्यांवर रुसून बसली आहे.विलिनीकरण करावे,या एकाच मागणीसाठी एसटी कर्मचारी महिनाभरापासून संप करीत आहेत.सरकारने विविध बाजुंनी संपकर्‍यांशी चर्चा केली.पगारवाढही जाहीर केली.पण कर्मचारी काही मागणीपासून दूर जायला तयार नाहीत.अखेर सरकारने कारवाईचे शस्त्र उगारताच काही प्रमाणात कर्मचारी रुजूही झाले.पण अद्यापही पूर्ण क्षमतेने एसटी काही पूर्वपदावर आलेली नाही हे वास्तव कुणीही नाकारु शकत नाही. त्यामुळे एसटी स्थानकातून घुमणारा आवाज आता लुप्त झाला आहे.

पहाटेपासून रात्रीपर्यंत प्रवासी,एसटी कर्मचार्‍यांच्या वर्दळीने भरुन जाणारी आगारे आता ओस पडली आहेत. याचा परिणाम छोट्या,मोठ्या व्यावसायिकांवरही मोठ्या प्रमाणात झाला आहे.एसटी स्थानक परिसरातील रिक्षाचालकही प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहेत.कारण संपामुळे एसटी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे आता एसटीतून प्रवासी येण्याचे पूर्णपणे थांबले आहे.नाहीतर दिवसाला शेकडो प्रवासी येतात त्यातून रिक्षाव्यवसायही कमालीचा चालतो.हॉटेल व्यावसायिकांचीही अशीच अवस्था झालेली आहे.

पेपर स्टॉल्सवरही पेपरची संख्या कमी होताना दिसत आहे. नेहमी एसटी कॅन्टिनमध्ये दिसणारी गर्दीही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने हॉटेल व्यावसायिकही हवालदिल आहेत. तिकीट आरक्षणासाठी होणारी गर्दीही आता कमी झालेली आहे.नेहमी प्रवाशांना माहिती देणार्‍या वाहतूक नियंत्रकांचा परिचित आवाजही आता बंद झाला आहे.तो कधी सुरु होईल याबाबत कुणीच ठोस काहीच सांगू शकत नाही. कारण संप कधी मिटेल हे कुणालाच माहिती नाही. कर्मचारी म्हणतात अभि नही तो कभी नही. कारण आज आम्ही मागे हटलो तर सरकार एसटीचे खासगीकरण केल्याशिवाय राहणार नाही. त्याचा त्रास प्रवाशांनाच होणार आहे. त्यामुळेच आम्ही मागणीवर ठाम आहोत. तर एसटी महामंडळही विलिनीकरण हे तातडीने होणे अशक्य आहे, असे वारंवार सांगत आहे. या दोघांच्या वादात सर्वसामान्य प्रवासी मात्र कमालीचा हवालदिल झालाय हे नक्की.

Exit mobile version