खारेपाटात आरोग्य सुविधांसाठी प्रयत्नशील; चंद्रकांत मोकल यांचे प्रतिपादन

। खारेपाट । वार्ताहर ।
खारेपाट विभागातील जनतेला भेडसावणारी मुख्य समस्या आरोग्याची आहे. यादृष्टीने खारेपाटात अत्यावश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केले. संघाच्यावतीने हनुमान मंदिर मांडवखार, ता. अलिबाग येथे मांडवखार व परिसरातील इयत्ता 1 ली ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या व शालेय वस्तू वाटप व विद्यार्थी गुणगौरव समारंभात सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते अध्यक्षपदावरून उपस्थितांना संबोधित होते.

यावेळी त्यांनी सांगितले की, खारेपाट विभाग शिक्षण क्षेत्रात पुढे येत आहे. मात्र, अजूनही आवश्यक आरोग्यविषयक सोयीसुविधा तळागाळात पोहोचत नाहीत. यासाठी आगामी काळात आरोग्य शिबिरे व अन्य माध्यमाने सहकार्य करु. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते दिलीप म्हात्रे, संजय मोकल, कमळाकर पाटील, विजय पाटील, आनंद म्हात्रे यांनी विद्यार्थीवर्गाला मार्गदर्शन केले.

दरम्यान, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अंतर्गत माध्यमिक विद्यामंदिर फोफेरीमधून इ.10वीच्या परीक्षेत 85 टक्के गुण प्राप्त केलेल्या दिपेश दिनेश पाटील, 83.80 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्या समीक्षा संदीप पाटील, 84 टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्या सिद्धी सचिन मोकल, तसेच 12 वीच्या परीक्षेत 75 टक्के गुण मिळविलेल्या जान्हवी अजित मोकल यांजबरोबर बीएससी पदवी परीक्षेत 87 टक्के गुण प्राप्त केलेल्या सिद्धेश शंकर मोकल या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊनयावेळी चंद्रकांत मोकल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी पहिली ते बारावीपर्यंतच्या 150 विद्यार्थ्यांना वह्या व शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रारंभी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे रायगड जिल्हा सचिव संजू पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक करुन संघाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील आंबा, भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर मोकल यांनी केले. विद्युत क्रीडा मंडळ मांडवखार व ग्रामस्थ मंडळ मांडवखार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

Exit mobile version