| पनवेल | प्रतिनिधी |
शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनी भाजपमध्ये प्रवेश करत प्रभाग 10 मधून उमेदवारी मिळवल्याने ही लढत भगत यांच्यासाठी सोप्पी वाटत होती. मात्र, शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीकडून माजी नगरसेवक गोपाळ भगत यांना त्यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे प्रभाग 10 मधील निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रंजक वळणावर पोहोचली आहे.
शेकाप आणि महाविकास आघाडीने एकजूट होऊन ही पनवेल महानगरपालिका निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. रस्ते, पाणी आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या नागरी समस्यांवर आघाडीने भर दिला आहे. त्याचसोबत या प्रभागातील हक्काची मते टिकवून ठेवण्यासाठी पदयात्रा आणि कोपरा सभांचा धडाका लावला आहे. प्रभाग 10मध्ये शेकापच्या जुन्या कार्यकर्त्यांची फळी आणि भाजपचा वाढता विस्तार यामुळे ही लढत केवळ एका उमेदवाराची नसून दोन विचारसरणींमधील संघर्षाची बनली असल्याचे मत राजकीय विश्लेषकानी व्यक्त केले आहे. पालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत गोपाळ भगत यांनी प्रभाग 9 मधून नगरसेवक म्हणून निवडणूक जिंकली होती. तर, रवींद्र भगत यांनी प्रभाग 10 मधून शेकापच्या चिन्हावर विजय मिळवला होता. रवींद्र भगत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने प्रभाग 10 मधील निवडणूक रवींद्र भगत यांना सोप्पी ठरण्याची शक्यता लक्षात घेत शेकाप-महावविकास आघाडीकडून गोपाळ भगत यांना या प्रभागात उमेदवारी दिली. त्यामुळे रवींद्र भगत यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. तसेच, प्रभाग क्रमांक 10 ‘ब’मधून ॲड. प्रज्ञा पाटील, प्रभाग 10 ‘क’मधून शीतल माळेवे व प्रभाग क्रमांक 10 ‘ड’मधून संतोष जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.







