खा. तटकरेंच्या खोट्या आश्‍वासनांचा फुगा फुटला

कार्यकर्त्यांच्या खेचाखेचीमुळे रा.काँ-काँग्रेसमध्ये जुंपली; काँग्रेस जिल्हाध्यक्षांची जोरदार चपराक
। पनवेल । वार्ताहर ।
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या कि, इतर पक्षातील लोकप्रतिनिधीना विविध आश्‍वासने देऊन साम-दाम, दंड-भेद या सर्व नितीचा वापर करून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करवून घ्यायचं आणि स्वतःची पाठ थोपटून घेण्याचं काम खा. सुनिल तटकरे करीत आहेत. इतकंच नाही तर विकासकामांच्या जोरावर राष्ट्रवादी पक्ष वाढतोय असे वरिष्ठांना भासवाण्यातही ते कमी पडत नाहीत. भोळ्या-भाबड्या लोकप्रतिनिधींचा वापर करायचा आणि काम झाले कि, रस्त्यावर सोडुन द्यायचे हा तटकरेंचा शिरस्ता असल्याचे सांगत काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी खा. सुनिल तटकरे यांच्या जोरदार टिका केली.

अलिकडेच तटकरेंनी रोहा पंचायत समितीचे सदस्य बिलालशेठ कुरेशी या नागोठणे विभागातील काँग्रेस सदस्याचा भुलथापांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घेतला. परंतु अवघे 24 तास उलटण्याच्या आतच नागोठणे विभागातील काँग्रेसचे नेते शब्बीर पानसरे, शहर अध्यक्ष अशफाक पानसरे, युवा नेते सद्दाम दफेदार यांनी बिलाल कुरेशी यांना परत स्वगृही आणले.

काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव नंदा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बिलाल कुरेशी यांचे काँग्रेसमध्ये स्वगृही स्वागत करण्यात आले. हा सोहळा महेंद्र घरत यांच्या शेलघर येथील सुखकर्ता या बंगल्यावर पार पडला. यावेळी शब्बीर पानसरे, शहर अध्यक्ष अशफाक पानसरे, राजेंद्र म्हात्रे, युवानेते सद्दाम दफेदार, सर्फराज हाफिज, रमीझ दफेदार, आदिल पानसरे आदी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात विकासकामांचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. मुंबई- गोवा महामार्गावर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हजारो तरुण, तरुणींनी जीव गमवावा लागला आहे. परिणामी अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. मात्र याचे कोणतेच सोयरसूतक तटकरेना नाही. हजारो तरुण बेरोजगारीला तोंड देत आहेत. याकडे लक्ष न देता केवळ सत्तेचा वापर आपल्या परिवाराचाच विकास करण्यातच केला जात असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या वाढीसाठी ज्या नेत्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, कष्ट केले, आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले, त्यामध्ये माजी आ. सुरेश लाड असतील, वसंत ओसवाल असतील अशा अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे अस्तित्वचं त्यांनी नष्ट करण्यास सुरवात केली आहे. केवळ तटकरे कुटुंब सत्तेवर कसे राहील, याचाच ते विचार करीत आहेत. त्यांना जनतेशी काहीच देणं-घेणं नाही. ज्या-ज्या कार्यकर्त्यांना त्यांनी बळजबरीने आपल्या पक्षात घेतले होते. ते सर्व कार्यकर्ते आता राष्ट्रवादीतुन बाहेर पडताना दिसत आहेत, असेकही महेंद्र घरत यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version