चोरी, गहाळ झालेले 944 अधिक मोबाईल परत मिळाले; सीईआयआर पोर्टल ठरले मार्गदर्शक
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
चोरी, गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू देण्याचे काम रायगड पोलिसांनी केले. सायबर पोलिसांच्या दमदार कामगिरीमुळे एका महिन्यात 24 मोबाईल हस्तगत करण्यात यश आले असून आतापर्यंत 944 मोबाईल मुळ मालकांना परत करण्यात आले आहे. सीईआयआर या पोर्टलच्या मदतीने उत्तरप्रदेश, तामीळनाडू, ओडिसा, गुजरात, बिहार राज्यातून मोबाईल मिळविले आहेत. मोबाईल परत मिळविण्यात रायगड पोलिसांची कामगिरी राज्यात अव्वल स्थानावर असल्याचे बोलले जात आहे.
मोबाईल हा आता मानवी आयुष्यात महत्वाचा घटक म्हणून मानला जातो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल प्रत्येकाच्या हातात कायमच असतो. त्यामुळे मोबाईलविना राहणे कठीण झाले आहे. मोबाईल गहाळ व चोरी झाल्यावर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर तो लवकर मिळेल, की नाही, हा प्रश्न कायमच निर्माण झाला होता. मात्र रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी हा प्रश्न कायमचा सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. रायगड पोलीस दलामध्ये स्वतंत्र कार्यरत असलेल्या सायबर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सुचना देत गहाळ व चोरीला गेलेले मोबाईल शोधण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक रिझवाना नदाफ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई श्रेयस गुरव, सहाय्यक फौजदार, अजय मोहिते, महिला पोलीस हवालदार सुचिता पाटील, पोलीस हवालदार राजीव झिंजुर्टे, पोलीस नाईक, तुषार घरत, समीर पाटील, राहूल पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली. सीईआयआर पोर्टलद्वारे गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आला. महिन्याभरात 24 मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. मागील ते चार वर्षापासून सहा महिन्यात गहाळ झालेल्या 944 मोबाईलचा शोध घेऊन ते मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या हस्ते 24 मालकांना बुधवारी मोबाईल परत करण्यात आले. गहाळ, चोरीला गेलेला मोबाईल परत मिळाल्याने मोबाईल मालकांच्या चेहऱ्यावर हसू दिसून आले.
नागरिकांना आवाहन
मोबाईल गहाळ झाल्यास त्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात त्वरित संपर्क साधून करण्यात यावी. महाराष्ट्र शासनाच्या सीईआयआर पोर्टलवर जाऊनदेखील तक्रार नोंदविण्यात यावी. मोबाईल हस्तगत करून मोबाईल परत करण्यास सायबर पोलिसांना सोईचे होईल असे आवाहन पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले.
