जालना लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद; मराठा आंदोलक आक्रमक

| मुंबई | प्रतिनिधी |

जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन करणाऱ्यांवर शुक्रवारी झालेल्या निर्घृण लाठीहल्लाचे तीव्र पडसाद शनिवारी राज्यभरात उमटले. मराठवाड्यात अनेक ठिकाणी दगडफेक व जाळपोळीचे प्रकार घडले. अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे आंदोलकांची व जखमींची भेट घेण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांची रीघ लागली. या घटनेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली. शुक्रवारी मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवरून लक्ष हटवण्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक हा प्रकार घडवून आणला असा आरोप काँग्रेसने केला. तर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

लाठीहल्ल्याच्या घटनेबद्दल राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करण्यात येतंय. मराठा आंदोलक पोलीस विभागासह राज्य सरकारचाही निषेध व्यक्त करत आहेत. बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं मोठा तणाव निर्माण झाला. जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी माजलगाव इथं जमलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलकांनी काही दुकानावरही दगडफेक केली. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाल्यानं पोलिसांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेणं पसंत केलं.

संभाजीनगरात बस जाळण्याचा प्रयत्न
याप्रकरणी संभाजीनगरात तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी मराठा आंदोलकांनी शुक्रवारी रात्री बस जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. आज सकाळीही पुंडलिकनगर परिसरात मराठा मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.

नंदुरबार जिल्ह्यात बसफेऱ्या बंद
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं नंदुरबार शहरातील जगतापवाडी चौफुली परिसरात आंदोलन करण्यात आलं. परंतु अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालं नसल्यानं लोकशाही मार्गानं आंदोलन करण्यात येत होतं. परंतु सरकार दडपशाही करत असून आंदोलकांवर अन्याय करत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा च्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला असा आंदोलकांचा आरोप आहे. तर प्रशासनाकडूनदेखील खबरदारी घेण्यात येत आहे.

मराठा व धनगर आरक्षणाचे काय?
देशभरातील महत्वाच्या पक्षांचे नेते मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आले असताना या बैठकीचा संदेश देशभर जाऊ नये व इंडिया आघाडीच्या बैठकीपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सत्तेतील भाजपाने जालन्याची घटना घडवून आणली. आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजातील निर्दोष बांधवांवर लाठीहल्ला करण्यात आला. हा हल्ला सरकारच्या आदेशानेच झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. निरपराध लोकांवर हल्ला करुन विरोधकांवर आरोप करण्याचे पाप भाजपा करत आहे. आगीत तेल ओतण्याचे काम भाजपाचे आहे, काँग्रेसचे नाही. काँग्रेस नेहमीच शांततेच्या मार्गाने सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन काम करत असते. देशात जातनिहाय जनगणना केल्याशिवाय सर्व समाज घटकांना न्याय मिळणार नाही. काँग्रेस पक्षाची तीच भूमिका असून जातनिहाय जनगणना करण्यास भाजपाचा मात्र विरोध आहे. सत्तेत आल्यावर 24 तासात आरक्षण देण्याच्या वल्गणा देवेंद्र फडणवीस यांनीच केल्या होत्या. धनगर समाजाला आरक्षण देतो, मराठा समाजाला आरक्षण देतो अशी आश्वासने फडणवीस यांनीच दिली होती मग आता काय झाले, सत्तेत येऊन वर्ष झाले अजून का आरक्षण दिले नाही, असा सवालही त्यांनी केला.

समाजाची सहनशीलता पाहू नका, उदयनराजे भोसलेंचा इशारा!
आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. काल (शुक्रवार) मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसाचार झाला. यामधे पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामध्ये काही पोलीस देखील जखमी झाले. दरम्यान आज खासदार उदयनराजे भोसले आणि शरद पवार यांनी अंतरवाली सराटी येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. स्वत:च्या भाषणानंतर शरद पवार यांनी उदयनराजे यांना माईक दिला. उदयनराजे म्हणाले, मराठा समाजाची सहनशीलता पाहू नका. सर्व समाजातील लोकांना न्याय मिळत असेल तर मराठा समाजाला न्याय का मिळत नाही. हा न्याय फार वर्षापूर्वी मिळायला हवा होता. उदयनराजे भोसले म्हणाले, 57 ते 58 मोर्चे शांततेत काढले पण याचा अर्थ असा नाही की मराठा समाज सहन करतो तर तुम्ही त्यांची परिक्षा बघावी. सर्वात मोठा समाज मराठा समाज आहे, यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. गायकवाड कमिशनचा अहवाल सुप्रीम कोर्टात टिकला नाही. मराठा समाजाला न्याय देण्याचे काम करावे.

तोडगा काढण्याची तयारी- अजित पवार
मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे. राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीनं थांबवण्याची गरज आहे. दगडफेक, जाळपोळ, हिंसाचारात आपल्या राज्याच्याच संपत्तीचं नुकसान होत आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे दगडफेक, जाळपोळ, हिंसाचार टाळला पाहिजे. आजपर्यंत शांततेच्या, लोकशाहीच्या मार्गानं सुरु असलेलं आंदोलन यापुढेही त्याच मार्गानं पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मी मराठा समाज बांधवांना, मराठा संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आवाहन करतो की, राज्याच्या काही भागात सुरु असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी आपण पुढे यावं.

दोषींवर कारवाई होईल- गिरीश महाजन
मराठा समाजाच्या आंदोलकांना बेछूट मारहाण करणे हे निषेधार्थ आहे. मात्र एसटी बसची जाळपोळ सरकारी मालमत्तेची तोडफोड करू नये. उद्या आमच्या मुलांना शाळेत जायचं आहे, महिलांना प्रवास करायचा आहे. शेवटी ती आपली संपत्ती आहे म्हणून कोणीही शासकीय मालमत्तेचे नुकसान करू नये, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. महाजन म्हणाले की, मागील चार-पाच दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू होते. त्यांनी पाणीदेखील घेतलं नव्हतं. त्यामुळे त्यांची प्रकृती खराब होत चालली होती. अशाप्रकारे रास्त मागणीसाठी एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका होऊ नये. हे योग्य नसल्याने सरकार म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. मात्र त्या ठिकाणी दगडफेक झाली जनतेचा रोष एवढा झाला होता की पोलिसांना लाठीमार करावा लागला. मात्र तो इतका बेछूटपणे केला की त्याचे समर्थन कोणी करू शकत नाही. या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं महाजन यांनी आश्वासन दिलं.

एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्यावा
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील मराठा आंदोलकांवरील हल्ल्याप्रकरणी सरकारवर टीका केली असून, त्यांनी या घटनेला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीसांना जबाबदार धरले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी लाठीहल्ल्याप्रकरणी घटनेचा निषेध नोंदवत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याचे कळते. या निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे.

Exit mobile version